लातूरच्या नाट्यगृहाचे संकल्पचित्र.
नाट्यगृहाच्या बांधकामावरील ‘पडदा’ उघडणार
----
नाट्यगृहाचे ‘रखडलेले’, ‘प्रलंबित’ प्रयोग थांबणार
----
आचारसंहिता संपल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू; १९ कोटींतून उर्वरित कामांना मिळणार गती
---
सुशांत सांगवे : सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ३० : लातूरकरांसाठी बहुप्रतीक्षित असलेल्या नाट्यगृहाच्या रखडलेल्या बांधकामावरील ‘पडदा’ आता लवकरच उघडला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतची निविदा प्रसिद्ध झाली असून, १८ कोटी ८५ लाख रुपयांतून नाट्यगृहाच्या उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच शहरात पहिले नाट्यगृह उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लातुरातील नाट्यगृह अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे, याकडे ‘सकाळ’ने सातत्याने सरकारचे लक्ष वेधून घेतले. या वृत्ताची राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दखल घेऊन १५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नाट्यगृहाच्या आजवर झालेल्या कामांची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नाट्यगृहाच्या प्रलंबित व उर्वरित कामांची माहिती घेतली. तसेच, नाट्यगृहाचा नागरिकांना लवकरात लवकर उपयोग होण्यासाठी मंजूर उर्वरित कामाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पालकमंत्री भोसले यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर उर्वरित कामासाठी आवश्यक असलेले तांत्रिक अंदाजपत्रक तातडीने तयार करून त्यास तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेण्यात आली. यामध्ये स्थापत्य आणि विद्युत कामाकरिता तरतूदही करण्यात आली. मात्र, त्यानंतर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे निविदा ठरलेल्या वेळेवर प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. अखेर निवडणुकीची आचारसंहिता संपताच क्षणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, कामास तातडीने सुरवात केली जाणार आहे. जास्तीत जास्त वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या भिंती, रंगमंचीय व्यवस्था, आसनव्यवस्था, अग्निसुरक्षा अशा आवश्यक कामांचा यात समावेश आहे.
---
कोट ----
नाट्यगृह हा लातूरसाठी महत्त्वाचा विषय असून, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नाट्यगृहाच्या कामाची पुढील कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत आहे. आचारसंहिता संपल्याने नाट्यगृहाचे उर्वरित काम लवकर सुरू करून निर्धारित कालमर्यादेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- दीपक टेकाळे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
---
असा आहे इतिहास
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात १ हजार ३०० आसनक्षमतेचे नाट्यगृह उभारण्याला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. या नाट्यगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे २४.७४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला होता. यातील पहिल्या टप्प्यात केवळ १५ कोटी रुपये मंजूर झाले. या निधीतून नाट्यगृहाचे अर्धे काम पूर्ण झाले. मात्र, पुढील टप्प्यातील मंजूर कामांचा निधी मिळाला नाही. त्यामुळे नाट्यगृहाचे बांधकाम अनेक वर्षे रखडलेल्या स्थितीत आहे. अर्धवट बांधकामाच्या जागेभोवती पत्र्याचे कुंपण उभारून ही वास्तू बंद ठेवण्यात आली. आता पालकमंत्री भोसले यांच्या प्रयत्नांमुळे रखडलेले हे नाट्यगृह पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
---