लातूरची पाणीटंचाई मानवनिर्मित?
युवक संघटना ः ऊस, कारखान्यांच्या पाणीवापरावर प्रश्नचिन्ह
--
लातूर, ता. १७ : लातूर जिल्ह्यासह शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईला केवळ नैसर्गिक परिस्थिती जबाबदार नसून, ही टंचाई मोठ्या प्रमाणात मानवनिर्मित असल्याचा आरोप शिवा लिंगायत युवक संघटनेने केला. सामान्य नागरिकांना आठवडाभर पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना साखर कारखान्यांना पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याचा दावा करत संघटनेने प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
संघटनेने अध्यक्ष दयानंद पाटील म्हणाले, लातूरसारख्या पाणीटंचाईग्रस्त भागात ऊस लागवड होत असल्याने उपलब्ध जलस्रोतांवर मोठा ताण निर्माण होत आहे. साखर उत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असल्याचे विविध अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणीवापराचे नियोजन करण्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा कमी होत असताना काहीजण कारखाने मृत साठ्यातून जॅकवेलद्वारे पाणी उपसा करीत असल्याचा आरोप दयानंद पाटील यांनी केला आहे. या आरोपांची प्रशासनाने तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली.
जलसंकटावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी संघटनेने ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक करावे, तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागात नवीन साखर कारखान्यांना मंजुरी देऊ नये तसेच शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणारी कडधान्ये, तेलबिया आणि फळबागांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.