लातूरच्या पाणीटंचाईवर तातडीने बैठक घ्या
भाजप शहर जिल्हाध्यक्ष कव्हेकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
--
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १५ ः सप्टेंबरचा अर्धा महिना लोटला तरी अद्यापपर्यंत अपेक्षित पाऊस पडलेला नाही. परिणामी लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठी सध्या उपलब्ध आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर प्रकल्पही मृत साठ्यात आहेत. या परिस्थितीत लातूर शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जिल्हा व महापालिका प्रशासनासह पाणीपुरवठा विभागाची संयुक्त आढावा बैठक घेवून संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेत उपाययोजनांसाठी मार्गदर्शक निर्देश करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केली आहे.
यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात अपेक्षित सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्याचबरोबर लातूर शहराला पाणीपुरवठा करता येवू शकणाऱ्या लातूर जिल्ह्यातील इतर प्रकल्पही मृत साठ्यात आहेत. महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मांजरा प्रकल्पातील पाणी उन्हाळ्यात शहराला उपलब्ध होईल का याबाबत साशकंता आहे. परिणामी लातूर शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेवून लातूर शहराला उपलब्ध पाणी साठ्यातून आगामी कितीदिवस पाणी पुरवठा होवू शकतो याबाबत विचार विनिमय करावा. त्याचबरोबर संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी काय-काय उपाययोजना करणे अपेक्षित आहे. याबाबतही प्रशासनाकडून माहिती घेवून त्याबाबत मार्गदर्शक निर्देश द्यावेत, अशी मागणी कव्हेकर यांनी केली आहे.