टंचाई मुकाबल्यासाठी १०२ कोटींचा आराखडा
-----
टँकर, विंधन विहिरींवर भर; नळयोजनांच्या दुरुस्तीसाठी ३८ कोटी ५५ लाखांची तरतूद
-----
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २४ ः जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील जलस्रोतांची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डिसेंबरअखेरपर्यंतचा जिल्ह्यासाठी १०२ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि विंधन विहिरींच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने भूजलपातळी आणि उपलब्ध जलसाठ्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, येत्या काही महिन्यांत अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी नियोजन केले जात आहे. या आराखड्यात सर्वाधिक भर नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर देण्यात आला आहे. त्यासाठी ३८ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये नळ योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, योजनांमधील तांत्रिक बिघाड, दुरुस्तीची आवश्यकता आणि पाण्याची अपुरी उपलब्धता यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योजनांची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
पाणीटंचाई तीव्र झाल्यास नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १९ कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही, अशा ठिकाणी टँकरचा पर्याय वापरला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी विंधन विहिरी घेण्यावरही भर दिला जाणार आहे. त्यासाठी आराखड्यात १६ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
-----
...तर नागरिकांना मिळेल आधार
एकीकडे पावसाअभावी पाण्याचे संकट गडद होत असताना दुसरीकडे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे १०२ कोटींच्या टंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी आणि उपाययोजनांची वेळेत पूर्तता झाल्यास ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.
----
जिल्ह्याच्या आराखड्यात केलेल्या तरतुदी
-
योजनेचे नाव------------------------------संख्या--------- अंदाजित खर्च
टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा---------------८५८----------१९ कोटी ६८ लाख
खासगी विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहण-------१९४८------------११ कोटी ४९ लाख
विंधन विहिरी घेणे-----------------------१७१९------------------१६ कोटी २५ लाख
नळ योजना विशेष दुरुस्ती करणे-----------३९१---------------३८ कोटी ५५ लाख २५
विंधन विहिरीची दुरुस्ती करणे---------------१७७-------------१ कोटी ६४ लाख
तात्पुरत्या पूरक नळ योजना करणे--------------९१-----------------आठ कोटी ३१ लाख
विहिरी खोल करणे, गाळ काढणे---------------१८१-----------------तीन कोटी १० लाख
बुडक्या घेणे----------------------------४८----------------४९ लाख
स्रोत बळकटीकरण करणे-------------------२७-----------------दोन कोटी ९६ लाख
----------------------------------------------
एकूण-------------------------------------५३७८-----------१०२ कोटी ४७ लाख