(((( सायबर अलर्ट ))))
---
ॲड. चैतन्य धारूरकर
९३२५२१३७५९
---
जरी चॅट जीपीटीचि होती गुरू।
तरि कां घेणे लागे अवतारू।।
---
वकिली व्यवसाय आणि विधी शिक्षणाला नियंत्रित करणारी ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ ही शीर्ष संस्था आहे. विधी महाविद्यालये आणि अभ्यासक्रमाविषयीची नियमावली बार कौन्सिलने वर्ष २००८ मध्ये जारी केली. विधी महाविद्यालयात पार पडणाऱ्या तासिका, प्रॅक्टिकल आणि अभिरूप न्यायालये अशा सर्व घटकांमध्ये मिळून विद्यार्थ्यांची एकत्रित वार्षिक उपस्थिती ७० टक्के असावी, असे यातील नियम क्र. १२ सांगतो. अगदीच अपवादात्मक परिस्थितीत ५ टक्क्यांपर्यंतची सूट प्रसंगी संबंधित विद्यार्थी मागू शकतो. या नियमानुसार उपस्थिती नसल्याचे आढळून आल्यास संबंधित विद्यार्थी परीक्षेस बसण्यास अपात्र ठरतो.
त्याचे झाले असे, की या नियमानुसार हजेरीची पूर्तता करत नसल्याचे कारण सांगून चेन्नई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यापीठाने काही विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यापासून मज्जाव केला. यावर विद्यार्थ्यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या एकल पीठाकडे याचिका दाखल केली. सदर नियम शिथिल करून आपल्याला परीक्षेस बसू द्यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली. तंत्रज्ञान आणि माहिती क्रांतीच्या युगात शिक्षणाची नवनवीन माध्यमे उदयाला येत असताना विद्यार्थ्यांना अशा जाचक नियमाला सामोरे जावे लागत आहे, याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने चिंता व्यक्त केली. शिवाय या नियमाबाबत फेरविचार करण्याचा आदेश न्यायालयाने बार कौन्सिलला दिला. विद्यापीठानेदेखील आपल्या सक्तीच्या हजेरीबाबतचे धोरण शिथिल करून याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे, असा आदेश एकल पीठाने दिला.
मात्र, विद्यापीठाने सदर आदेशाला मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमक्ष (द्विसदस्यीय पीठासमक्ष) आव्हान दिले. विद्यापीठाची याचिका न्यायालयाच्या खंडपीठाने मान्य केली. हजेरीबाबत ढिसाळ असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहानुभूती देणे अनुचित ठरेल, असे न्यायालय म्हणाले. चॅट जीपीटी किंवा एआयने कितीही प्रगती साधली, तरी प्रत्यक्ष वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकाची जागा ही साधने घेऊ शकत नाहीत. स्वयंशिस्त, वक्तशीरपणा आणि वाद-चर्चा ही संस्कारमूल्ये समाजवर्तुळातील सक्रिय वावराद्वारेच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली जाऊ शकतात. एआय हा मानवी बुद्धिमत्तेच्या समीप येऊ शकेल; पण कर्तव्यपरायणता आणि तत्त्वनिष्ठा ही जीवनमूल्ये प्रत्यक्ष वर्गखोल्यांमधील वावराद्वारेच रुजतात, असे निरूपण न्यायालयाने केले.
जरी ग्रंथचि होती गुरू।
तरि कां घेणे लागे अवतारू।।
सगुण गुरूच्या महत्त्वाचे वर्णन करताना संत एकनाथ महाराजांनी मांडलेला हा विचारच जणू न्यायालयाने आपल्या निकालातून उद्धृत केला आहे.
--