बाजारात लिंबाची आवक घटली
----
भाव २०० रुपये किलोवर ः उन्हामुळे फळगळ झाल्याने उत्पन्नावर परिणाम
--------------------------------------
छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : मागील महिनाभरापासून बाजारात लिंबाची आवक घटली आहे. दुसरीकडे मागणी वाढल्याने लिंबाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिकिलो ६० रुपयांवर असलेले लिंबू आता थेट २०० रुपये किलोवर पोचले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या बाजारात लिंबाने सर्वाधिक भाववाढ नोंदविली आहे.
यंदा आजवर समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या आठवडाभरापासून कडक ऊन पडत आहे. फळगळीचे प्रमाण वाढल्याने लिंबाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने बाजारातील लिंबाची आवक कमी झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी जाधवाडी भाजीमंडईत रोज लिंबाची आवक ३० ते ३५ क्विंटलपर्यंत होती. ती आता १० ते १५ क्लिंटलवर आली आहे. शनिवारी (ता. पाच) भाजीमंडईत १२ क्विंलट लिंबाची आवक झाली. त्यास दर्जानुसार प्रतिक्विंटल ११ ते १३ हजार रुपयांचा भाव मिळाला. परिणामी, किरकोळ बाजारात लिंबाच्या भावात तब्बल १४० रुपयांची वाढ झाली. सध्या किरकोळ बाजारात लिंबाला प्रतिकिलो २०० रुपयांचा भाव मिळत आहे. इतर भाजीपाल्याच्या भावातही काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
----
शेवगा १००, तर अद्रक २०० रुपये
भेंडीचा भाव ४० वरून ५० रुपये, शेवगा ८० वरून १०० रुपयांवर पोचला आहे. कारल्याचे भाव ८० वरून ६०, कोबी ६० वरून ५०, हिरवी मिरची ७० वरून ६०, तर श्रावण घेवडा ८० वरून ६० रुपये प्रतिकिलो झाला आहे. अद्रकचा भाव २५० वरून २०० रुपयांवर आला आहे.
----
कंटुल्यात १०० रुपयांनी वाढ
कंटुल्याचा भाव आता १८० वरून २८० रुपये प्रतिकिलो झाला आहे. लसूण ३०० ते ४०० रुपये किलोने बाजारात मिळत आहे. बाजारातील भाववाढीत सध्या लिंबू आणि कंटुले ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
----
भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो, रु.)
बटाटे - २५ ते ३०
कांदा - ६०
भोपळा - ४०
काकडी - ४०
टोमॅटो - ४०
वांगे - ६०
भेंडी - ५०
गाजर - ६०
कारले - ६०
कोबी - ५०
वाल - ८०
गिलके - ८०
हिरवी मिरची - ६०
सिमला मिरची - ६०
दिलपसंद - ८०
लिंबू - २००
दोडके - ८०
शेवगा - १००
अद्रक - २००
लसूण - ३००- ४००
श्रावण घेवडा (बिन्स) - ६०
कंटुले - २८०