आला रे आला, बिबट्या आला

आला रे आला, बिबट्या आला

करमाड (जि.औरंगाबाद) : मागील काही दिवसांपासून करमाड पंचक्रोशीत बिबट्या दिसल्याच्या चर्चेला उधाण आले मात्र, तो कुठेच प्रत्यक्ष दिसून आला नव्हता किंवा या घटनेला पुरावा मिळत नव्हता. शेवटी, शनिवारी (ता.एक) सकाळी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमागच्या शेंद्रा बन शिवारातील डोंगरावर तो दिसून आल्याल्याची चर्चा होती. वन विभागाने हाती घेतलेल्या मोहिमेत दुपारी बिबट्याचे ठसे आढळून आले. यास वन विभागाच्या पथकानेही अधिकृत दुजोरा दिल्याने त्याचे या डोंगरावरील अस्तित्व सिद्ध झाले आहे.

मागील आठवडाभरापासून करमाड परिसरातील विविध गावांत बिबट्या दिसल्याची चर्चा होती; पण वन विभागाच्या पाहणीत या खमंग चर्चेला दुजोरा मिळू शकला नव्हता. मात्र, तेव्हापासून परिसरात बिबट्याची दहशत मात्र स्पष्ट जाणवत होती. 

परिसरातील गावात भीतीचे वातावरण 

25 डिसेंबर रोजी पहाटे सर्वप्रथम लाडगाव शिवारात बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर 26 डिसेंबर रात्री गारखेडा गावाशेजारील सुखना धरणाच्या पायथ्याशी तो आढळल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, यावेळी वन विभागाच्या पाहणीत दुसऱ्याच वन्यप्राण्याचे ठसे आढळून आल्याने ही फक्त चर्चाच ठरली. शेवटी शनिवारी (ता.एक) अधिकृत दुजोरा मिळाल्याने विषयास शेवटी विराम मिळाला.

शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक भीती 

26 डिसेंबर रोजी प्रथमच जयपूर येथे सकाळी बबन मते यांच्या गट क्रमांक 78 मधील शेतात असलेल्या गोठ्यातील एक गाय व पाच वर्षांचे वासरू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची खबर पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे पुन्हा एकदा "आला रे आला, बिबट्या आला' अशी आवई उठली. मात्र, जाणकारांच्या मते या गायी-वासरावर केलेला हल्ला हा बिबट्याने केलेला नसावा असा एक मतप्रवाह पुढे आल्याने ही चर्चा इथेच थांबली. 

बिबट्याच्या पायाचे ठसे 

शनिवारी (ता.एक) सकाळी नऊच्या सुमारास शेंद्रा एमआयडीसीमधील रेडिको कंपनीच्या पाठीमागील डोंगरावर काही सुरक्षारक्षकांना बिबट्या दिसून आला. यावेळी काहींनी बिबट्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात झूम करून घेतले होते. तेच दिवसभर सोशल मीडियावर झळकत होते. काहींनी डोंगराकडे कूचही केले.

सकाळी बिबट्या प्रत्यक्ष पाहिलेल्या सुरक्षारक्षकांनी ही बाब वन विभागास कळवली. तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. यू. काळे, वनरक्षक के. पी. शिंदे, अंकुश भागवत, वनमजूर बचाटे व इतरांनी सर्वप्रथम जयपूर डोंगरावर ठसे शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. मृत पावलेल्या गायी-वासराची पाहणी केली. मात्र, त्यांना हा केलेला हल्ला बिबट्याचा नसल्याचे दिसून आले. नंतर एमआयडीसीच्या पाठीमागील शेंद्रा बन शिवारातील डोंगरावर कंपार्टमेंट क्रमांक 220 मध्ये बऱ्याच ठिकाणी बिबट्यासारखे ठसे दिसून आले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com