कुष्ठरोगाचे आढळले ६७२ संशयित रूग्ण
जिल्ह्यात १ लाख २८ हजार नागरिकांची तपासणी, चार नवीन रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ९ : कुष्ठरोगाबाबत समाजातील भीती व गैरसमज दूर करत रुग्णांचे वेळेत निदान करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम राबवली जात आहे. १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत २ ऑक्टोबरपर्यंत १ लाख २८ हजार ४५२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ६७२ संशयित रूग्ण आढळून आले असून, त्यातील ४८० जणांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील २५ हजार ५४१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी सहवासित तपासणीत १४ हजार ४६३ सहवासितांपैकी ११ हजार २७७ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये ३ असंसर्गिक (पीबी) रुग्ण आढळले आहेत. फोकस लेप्रसी मोहिमेत ५ लाख ८७ हजार लोकसंख्येचे लक्ष्य असलेल्या या मोहिमेत १ लाख २८ हजार नागरिकांच्या तपासणीतून १ नवीन संसर्गिक (एमबी) रुग्ण निष्पन्न झाला आहे.
तालुकानिहाय तपासणीचा आढावा
जिल्ह्यात धाराशिव (३५,८२३ नागरिक), तुळजापूर (२३,४४५) आणि उमरगा (२६,६८२) तालुक्यांत सर्वाधिक तपासण्या झाल्या. याशिवाय वाशी (१२,१७०), भूम (१३,१७९), लोहारा (९,१३६), कळंब (७,४३९) आणि परंडा (५७८) तालुक्यांतही आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.
........
लक्षणे आणि उपचाराबाबत आवाहन
त्वचेवर संवेदनाहीन फिकट किंवा लालसर चट्टा असणे, हात-पायांना मुंग्या येणे आणि कानाच्या पाळ्या जाड होणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत. कुष्ठरोग बहुविध औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो. संसर्गिक रुग्णांवर १२ महिने तर असंसर्गिक रुग्णांवर ६ महिने मोफत उपचार केले जातात.
......
((कोट))
कुष्ठरोग लपवू नका. या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्या. घरोघरी येणाऱ्या आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे.
- डॉ. सतीश हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशिव