पत्र लिहा आणि जिंका ५० हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ४ : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर ढाई आखर या भव्य पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धरतीमातेला पत्र : निसर्गाचे रक्षण करण्याचे माझे वचन’ हा या स्पर्धेचा मुख्य विषय असून, बीड डाक विभागाने जास्तीत जास्त नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही स्पर्धा १८ वर्षांपर्यंत आणि १८ वर्षांवरील अशा दोन गटांत खुली असून, स्पर्धकांना कोणत्याही भाषेत आपले पत्र लिहिता येईल. पाकिटातील पत्रासाठी १,००० शब्दांची, तर अंतर्देशीय पत्रासाठी ५०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी आपले पत्र मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई - ४००००१ यांच्या नावे लिहून पोस्टातील विशेष पेटीत टाकायचे आहे. हे पत्र पाठवण्याची शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. या पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरावर अनुक्रमे २५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये, तर राष्ट्रीय स्तरावर तब्बल ५० हजार, २५ हजार आणि १० हजार रुपयांचे भरघोस रोख पारितोषिक दिले जाणार आहे. निसर्गाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत मोठी बक्षिसे जिंकण्याची ही उत्तम संधी असल्याने बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन बीडचे डाक अधीक्षक एस. एन. आंबेडकर यांनी केले आहे.