लातूर ः येथील आईचं घर या प्रकल्पासाठी एलआयसीच्या वतीने ‘स्कूल व्हॅन’ देण्यात आली. यावेळी क्षेत्रीय व्यवस्थापक सनोज कुमार, अण्णासाहेब कदम, उदय सुटुंबेकर, मनोज समर्थ, विनायक वालवडकर, मिलिंद कुलकर्णी आदी.
‘आईचं घर’मधील मुलांसाठी
एलआयसीकडून स्कूल व्हॅन
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १४ ः दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत बोरीच्या श्री गजानन बहुद्देशीय संस्था संचलित ‘आईचं घर’ या दिव्यांग शैक्षणिक प्रकल्पातील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे ‘गोल्डन ज्युबिली फाउंडेशन योजनेअंतर्गत स्कूल व्हॅन भेट देण्यात आली.
एलआयसीचे पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सनोज कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत या व्हॅनचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. १२ ) उत्साहात पार पडला. प्रारंभी बालगृहातील लेझीम पथकाने ढोल-ताशांच्या गजरात उपस्थितांचे स्वागत केले. सनोज कुमार आणि क्षेत्रीय प्रबंधक अरुण राजदान यांच्या हस्ते व्हॅन संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. अध्यक्ष अण्णासाहेब कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एलआयसीचे वरिष्ठ मंडळ व्यवस्थापक उदय सुटुंबेकर, विपणन व्यवस्थापक मनोज समर्थ, विक्री व्यवस्थापक विनायक वालवडकर, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, शाखा व्यवस्थापक जगदीश निमजे, स्मिता जोशी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केले.
-----------