पांपटवार जीवनगौरव पुरस्काराची घोषणा
----
पाच जणांना १६ सप्टेंबरला करणार सन्मानित
---
नांदेड, ता. ७ : दिवंगत गंगाधरराव पांपटवार जयंती महोत्सव समिती, टीचर्स क्लब रुग्णालय आणि स्व. गंगाधरराव पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘स्व. गंगाधरराव पांपटवार जीवनगौरव पुरस्कारा’ची घोषणा डॉ. गजानन पांपटवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाच मान्यवरांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मथुताई सावंत, आरोग्य क्षेत्रासाठी डॉ. सुरेश खुरसाळे (रयत रुग्ण मंडळ, नांदेड), प्रसारमाध्यम क्षेत्रासाठी संजीव कुलकर्णी, प्रशासकीय क्षेत्रासाठी डॉ. अजय कदम आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी प्राचार्य डॉ. विजय शिवराम पवार यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे हे आठवे वर्ष असून, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव या माध्यमातून करण्यात येतो. पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फ.मुं. शिंदे (छत्रपती संभाजीनगर) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन पांपटवार, स्वागताध्यक्ष प्रा. डी.बी. जांभरूनकर आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. राम वाघमारे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत.