१२ वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्ट वापरास मनाई

१२ वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्ट वापरास मनाई
Published on: 
प्रौढांशिवाय १२ वर्षांखालील मुलांना लिफ्ट वापरास मनाई! - देखभालीची मासिक नोंद, वार्षिक सुरक्षा तपासणी बंधनकारक - सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : इमारतींमधील लिफ्टच्या देखभाल-दुरुस्तीपासून ते सुरक्षा तपासणी, विमा आणि अपघाताची माहिती देण्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या नव्याने निश्चित करण्यात आल्या आहेत. १२ वर्षांखालील मुलांना प्रौढ व्यक्तीशिवाय लिफ्ट, एस्कलेटर किंवा सरकता मार्ग वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यातील लिफ्ट, एस्कलेटर आणि सरकत्या मार्गांच्या सुरक्षित वापरासाठी ऊर्जा विभागाने ‘महाराष्ट्र लिफ्ट्स, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉक्स नियम, २०२६’ अधिसूचित केले आहेत. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या या नियमांच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या कायद्यानुसार एस्कलेटर आणि सरकत्या मार्गांची देखभाल मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून करून घेणे आवश्यक आहे. या यंत्रणांची किमान महिन्यातून एकदा देखभाल व तपासणी करावी लागेल. त्याची नोंद संबंधित नोंदवहीत करणे बंधनकारक आहे. तसेच, वर्षातून किमान एकदा किंवा विद्युत निरीक्षकाने निर्देश दिल्यास त्यापूर्वी सुरक्षा तपासणी, चाचणी आणि ऑडिट करून त्याचा अहवाल विद्युत निरीक्षकांकडे सादर करावा लागेल. - जुन्या लिफ्टमध्ये सुरक्षा उपकरणे बसविण्यास मुदत - लिफ्टच्या डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. यापूर्वीपासून सुरू असलेल्या ज्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही, स्वयंचलित बचाव उपकरण (एआरडी) किंवा ओव्हरलोड संरक्षण उपकरण (ओएलपीडी) नाही, त्यामध्ये ही उपकरणे एका वर्षाच्या आत म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२७ पर्यंत बसवावी लागतील. - सोसायट्यांची जबाबदारी वाढली - लिफ्टचा परवाना दर्शनी किंवा प्रवेशाच्या ठिकाणी लावणे आणि सुरक्षाविषयक सूचना फलक प्रदर्शित करणेही आवश्यक आहे. लिफ्ट, एस्कलेटर किंवा सरकत्या मार्गाच्या वापरासाठी दिलेला परवाना २० वर्षांसाठी वैध राहणार आहे. प्रवाशांच्या जोखमीचे संरक्षण करण्यासाठी थर्ड पार्टी विमा उतरविण्याची जबाबदारी मालकावर असेल. - अपघाताची माहिती २४ तासांत देणे आवश्यक - लिफ्ट, एस्केलेटर किंवा सरकत्या मार्गात अपघात झाल्यास त्याची माहिती विहित नमुन्यात २४ तासांच्या आत संबंधित विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलिस ठाण्याला द्यावी लागेल. दुरुस्ती किंवा बदलांसाठी सहा महिने अथवा त्यापेक्षा अधिक काळ यंत्रणेतून तोडून ठेवलेली लिफ्ट, एस्केलेटर किंवा सरकता मार्ग पुन्हा वापरण्यापूर्वी मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून आवश्यक चाचण्या करून घेणे बंधनकारक आहे. लिफ्ट ऑपरेटर म्हणून १८ वर्षांखालील व्यक्तीची नियुक्ती करता येणार नाही. ऑपरेटर शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आणि योग्य प्रशिक्षण घेतलेला असणे आवश्यक आहे. नियमांचे किंवा परवान्याच्या अटींचे उल्लंघन केल्यास दोषसिद्धीनंतर ५० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. उल्लंघन सुरू राहिल्यास पहिल्या दोषसिद्धीनंतर प्रत्येक दिवसासाठी एक हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त दंडाची तरतूद आहे. या नियमांमुळे लिफ्टचा परवाना असलेल्या इमारत मालकांसह संबंधित गृहनिर्माण संस्थांना देखभाल, तपासणी, विमा आणि सुरक्षा नोंदींकडे अधिक काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे. --------- कोट --- लिफ्टच्या सुरक्षिततेसंदर्भातील हा नियम पालकांमध्ये जागृती निर्माण करणारा आहे. नियम केल्यास त्याचे पालन करण्याकडे नागरिकांचा कल वाढेल. पूर्वीच्या लिफ्टच्या तुलनेत आधुनिक लिफ्ट अधिक सुरक्षित असून, त्यामध्ये स्वयंचलित दरवाजे (ऑटो डोअर) असल्याने अपघातांची शक्यता कमी झाली आहे. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी आणि जनजागृती महत्त्वाची आहे. त्यामुळे हा नियम स्वागतार्ह आहे. - संग्राम पटारे, अध्यक्ष, क्रेडाई, छत्रपती संभाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.