मूल्यमापन चाचणीत ४६ हजार ८१९ नवसाक्षरांनी सहभाग
-----
२,९८१ केंद्रांवर मूल्यमापन;
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २७ : केंद्र शासनाच्या उल्लास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत रविवारी (ता. २५) झालेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीत नांदेड जिल्ह्यातील ४६ हजार ८१९ नवसाक्षरांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, या परीक्षेत महिलांची संख्या पुरुषांपेक्षा तब्बल २७ हजार ४४१ ने अधिक होती. घरगाड्याची जबाबदारी सांभाळत महिलांनी दाखविलेली शिक्षणाची जिद्द साक्षरता अभियानासाठी प्रेरणादायी ठरली.
जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये एकूण २ हजार ९८१ परीक्षा केंद्रांवर ही चाचणी घेण्यात आली. यंदा जिल्ह्याला ४८ हजार ३१९ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६ हजार ८१९ जणांनी परीक्षा दिली. त्यामुळे निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत सुमारे ९६.९ टक्के सहभाग नोंदविण्यात आला. उर्वरित निरक्षरांनाही साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू असून, आगामी एप्रिल महिन्यात पुढील परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
------
उद्दिष्टपूर्तीसाठी जनजागृतीचे आव्हान
साक्षरता अभियानात महिलांचा मोठा सहभाग प्रेरणादायी ठरला आहे. मात्र, जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अद्याप प्रयत्नांची आवश्यकता आहे. आगामी परीक्षेपूर्वी निरक्षर व्यक्तींपर्यंत पोचणे, त्यांना नियमित सरावासाठी प्रोत्साहित करणे आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, यावर भर द्यावा लागणार आहे. केवळ परीक्षेत सहभागी होणे नव्हे, तर दैनंदिन व्यवहारात वाचन, लेखन आणि गणिताचा उपयोग करता येणे, हे अभियानाच्या यशाचे महत्त्वाचे मापदंड ठरणार आहेत.
-------
डिजिटल साक्षरतेवरही भर
या अभियानांतर्गत १५ वर्षे व त्यावरील शिक्षणापासून वंचित व्यक्तींना मूलभूत साक्षरतेची संधी दिली जाते. वाचन, लेखन आणि संख्याज्ञानासोबत डिजिटल साक्षरतेलाही महत्त्व देण्यात आले आहे. पैशांचा हिशेब ठेवणे, बँकिंग व्यवहार समजून घेणे, मोबाइलद्वारे डिजिटल सेवांचा वापर करणे आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक माहिती समजून घेणे, अशी कौशल्ये या माध्यमातून विकसित केली जातात. नवसाक्षरांना आत्मनिर्भर बनविणे आणि निरक्षरतेचे प्रमाण कमी करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
----------