डिसेंबरपर्यंत पुरणार पशुधनाचा चारा!

डिसेंबरपर्यंत पुरणार पशुधनाचा चारा!
Published on: 
डिसेंबरपर्यंत पुरणार पशुधनाचा चारा! ----- जिल्ह्यात सहा लाख पशुधन; दररोज २,३०६ टन वैरणाची गरज ----- धाराशिव, ता. १९ (बातमीदार) ः जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेनुसार एकूण पाच लाख ९५ हजार ८४४ पशुधन असून, त्यांच्यासाठी दररोज सुमारे दोन हजार ३०६ टन वैरणाची आवश्यकता आहे. सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेला व उपलब्ध होणारा चारा एक लाख ८५ हजार ४०० टन असून हा चारा डिसेंबरपर्यंत पुरेल, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. शेती आणि पशुपालन हे ग्रामीण जीवनाचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. कृषिप्रधान जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला महत्त्व आहे. शेतीतील अनिश्चित उत्पन्नाच्या काळात दूध उत्पादनातून मिळणारी नियमित कमाई शेतकऱ्यांना आर्थिक आधार देते. त्यामुळे पशुधनाचे संगोपन, त्यांच्यासाठी पुरेशा चाऱ्याची उपलब्धता हा केवळ पशुसंवर्धनाचा विषय नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याशी थेट संबंधित प्रश्न बनला आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेता, आगामी काळात चारा व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. २१ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात मोठ्या पशुधनाची (गायवर्ग व म्हैसवर्ग) संख्या तीन लाख २२ हजार ८०३, लहान पशुधनाची (गायवर्ग व म्हैसवर्ग) संख्या ४८ हजार २३३ असून, शेळ्या-मेंढ्यांची संख्या दोन लाख २४ हजार ८०८ आहे. जिल्ह्यातील पशुधनाच्या दैनंदिन चाऱ्याची गरज मोठी आहे. उपलब्ध अहवालानुसार, मोठ्या पशुधनासाठी दररोज एक हजार ९३६.८२ टन, तर लहान पशुधनासाठी १४४.७० टन, शेळ्या व मेंढ्यांसाठी २२४.८ टन वैरणाची आवश्यकता आहे. या सर्व पशुधनासाठी दररोज एकूण सुमारे दोन हजार ३०६ टन चाऱ्याची गरज भासते. त्यामुळे उपलब्ध चाऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेली आणि आगामी काळात उपलब्ध होणारी वैरण एकूण एक लाख ८५ हजार ४०० टन इतकी आहे. पशुधनाच्या दैनंदिन चाऱ्याची गरज विचारात घेता, उपलब्ध चारा डिसेंबरपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. मात्र, त्यानंतरच्या कालावधीसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com