पाच महिन्यांचाच चारा; पुढे टंचाईचे संकट!
---
८.२४ लाख पशुधनासाठी रोज ३ हजार टन चारा, १.८९ कोटी लिटर पाण्याची गरज
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १३ : जिल्ह्यातील पशुधनासाठी सध्या एकूण ४ लाख ९५ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार असल्याचे चारा व्यवस्थापन आराखड्यातून स्पष्ट झाले. हा चारा पाच महिन्यांपर्यंतच पुरू शकेल. त्यानंतर मात्र जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण ८ लाख २४ हजार पशुधन असून, त्यासाठी प्रतिमाह ९७ हजार मे. टन चाऱ्याची गरज आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर आतापासूनच भर दिला आहे.
सिंचन, कृषी, पशुसंवर्धन आणि पाणीपुरवठा विभागांनी उपलब्ध साधनसंपत्तीचा आढावा घेऊन चारा-पाण्याचा आराखडा तयार करावा आणि आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी सोमवारी (ता.१२) आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. कृषी विभागाच्या पेरणी क्षेत्रानुसार तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत वितरीत केलेल्या वैरण बियाण्यांच्या पेरणीतून उपलब्ध होणारा चारा फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या ८ लाख २४ हजार २५१ इतकी आहे. यात ४ लाख १६ हजार ७४० गायवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरे, ५६ हजार ८२८ वासरे आणि ३ लाख ५० हजार ६८३ शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. या पशुधनाला रोज आवश्यक असणाऱ्या चाऱ्याची गरज लक्षात घेऊन वर्ष २०२६-२७ चा चारा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३७ हजार ८९९ हेक्टर ऊस क्षेत्रातून २२ लाख ७३ हजार ९४० मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत ऊस क्षेत्राचा किमान ३० टक्के भाग चाऱ्यासाठी राखीव ठेवून सहा महिन्यांची गरज भागविण्याचा प्रस्ताव चर्चेत आला. राखीव ऊस शेतकऱ्यांकडून बाजारभावाने खरेदी करण्यासाठी शासन निर्णय काढण्याची गरजही व्यक्त झाली.
---
रोज तीन हजार मेट्रिक टन चाऱ्याची गरज
जिल्ह्यातील पशुधनासाठी रोज एकूण ३ हजार २२ मेट्रिक टन चारा आवश्यक आहे. यात गायवर्गीय आणि म्हैसवर्गीय जनावरांसाठी रोज २ हजार ५०० मेट्रिक टन, लहान पशुधनासाठी १७० मेट्रिक टन, तर शेळ्या-मेंढ्यांसाठी ३५१ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. या गणनेनुसार महिन्याला ९० हजार ६४८ मेट्रिक टन चारा लागतो. त्यामुळे उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
----
पिकांच्या अवशेषांतून चाऱ्याची उपलब्धता
वनक्षेत्र, बांधक्षेत्र, पडीक जमीन, कृषी पिकांचे दुय्यम उत्पादन आणि गवताळ कुरणांच्या माध्यमातून चारा उपलब्ध होतो. यामध्ये खरीप आणि रब्बी पिकांचे दुय्यम उत्पादन हा चाऱ्याचा प्रमुख स्रोत आहे. यातून ४ लाख २७ हजार ४४८ मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. याशिवाय वैरण विकास योजनेअंतर्गत ४१८.४५ क्विंटल बियाण्यांचे वितरण केले. त्यातून ८ हजार ७६६ मेट्रिक टन वैरण उत्पादित होण्याचा अंदाज आहे.
---
टँकरची संख्या ४६५ पर्यंत जाण्याची शक्यता
सध्या जिल्ह्यात १५९ टँकर सुरू असून, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ही संख्या ४६५ पर्यंत वाढवावी लागू शकते. सध्या ७९ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. पशुधनामध्ये लहान जनावरांना प्रतिदिन १५ लिटर, मोठ्या जनावरांना ४० लिटर, तर शेळ्या-मेंढ्यांना ४ लिटर पाणी लागते. एकूण सव्वाआठ लाख जनावरांना प्रतिदिन १ कोटी ८९ लाख २४ हजार ७४८ लिटर म्हणजे १८,९२४ क्युबिक मीटर एवढे पाणी लागते. त्याचे नियोजनही प्रशासनाला करावे लागेल.