हाताला काम नाही; कर्जवसुलीला स्थगिती द्या
-----
महिला बचत गटांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
----
जालना, ता. २० : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून, हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने महिला बचत गटांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा विचार करून फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी महिला बचत गटांच्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तालुक्यातील हिवरा रोशनगाव येथील महिला बचत गटांनी विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत रोजगार व उत्पन्नाची साधने कमी झाल्यामुळे कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा काळात बचत गटाकडे असलेले कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष राजू पाडमुख आणि महिलांनी कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी (ता. १९) निवेदनाद्वारे केली आहे.
----
((कोट))
आम्ही महिला बचत गटांनी कर्ज घेतले आहे. प्रत्येकीच्या वाट्याला एक लाख कर्ज आले आहे. दुष्काळामुळे एक महिना झाला; मात्र हाताला काम नाही. आम्ही घरी बसलो आहे. अशात कर्जाच्या हप्त्यासाठी फायनान्सचे प्रतिनिधी दारात येऊन बसत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी.
- मनीषा पाडमुख, महिला