कर्जमाफीच्या संकेतस्थळातील तांत्रिक अडथळे दूर करा! पात्र शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवू नका; आमदार कैलास पाटील यांची सहकार आयुक्तांकडे मागणी:

कर्जमाफीच्या संकेतस्थळातील तांत्रिक अडथळे दूर करा! पात्र शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवू नका; आमदार कैलास पाटील यांची सहकार आयुक्तांकडे मागणी:
Published on: 
कर्जमाफीच्या यादीत नाव, तरी लाभापासून वंचित? तांत्रिक अडथळे दूर करण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी कळंब, ता. ६ (बातमीदार) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळताना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही केवळ संकेतस्थळावरील तांत्रिक अडथळ्यांमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहत असतील, तर ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात आमदार पाटील यांनी सोमवारी (ता. पाच) पुणे येथे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांची भेट घेऊन दोन स्वतंत्र पत्रे सादर केली. जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या दोन याद्यांमध्ये ६७ हजार ६१९ शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी ५५ हजार ८७२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, ११ हजार ७४७ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. प्रलंबित शेतकऱ्यांपैकी ४ हजार ५९८ शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नसल्याचे कर्जमाफीच्या संकेतस्थळावर दिसत आहे. प्रत्यक्षात यातील अनेक शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक क्रमांक प्राप्त केला आहे. मात्र, ॲग्रीस्टॅकच्या अद्ययावत संकेतस्थळाचा कर्जमाफीच्या संकेतस्थळाशी थेट समन्वय नाही. त्यामुळे माहिती अद्ययावत होत नसल्याचा मुद्दा आमदार पाटील यांनी उपस्थित केला. दोन्ही संकेतस्थळांमध्ये तातडीने समन्वय साधून माहिती आपोआप अद्ययावत होण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. वारसांची प्रक्रियाही सुलभ करा मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठीची किचकट प्रक्रिया सुलभ करण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली. सध्या सर्व वारसांची माहिती नोंदविणे, त्यांचे आधार प्रमाणीकरण करणे आणि स्वतंत्र बचत खाते उघडणे बंधनकारक आहे. अनेक वारस वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने ही प्रक्रिया अडचणीची ठरत आहे. तांत्रिक त्रुटी व कागदपत्रांच्या प्रक्रियेमुळे पात्र शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ अडकू नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com