कर्जमाफीच्या एसओपीचा वारसांना फटका!
मृत शेतकऱ्यांच्या वारसांची बँकांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप
कळंब, ता. १५ (बातमीदार) : दुष्काळाच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना कर्जमाफीचा दिलासा मिळण्याची अपेक्षा असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील मानक कार्यप्रणाली (एसओपी) मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी अडथळा ठरत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. या नियमावलीतील तरतुदींमुळे बँकांकडून वारसांची अडवणूक होत असल्याचा आरोप करत आश्रुबा बिक्कड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळवताना संमतीपत्रे, प्रतिज्ञापत्रे आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणी येत आहेत. एकाच कुटुंबातील वारस वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने सर्वांची संमती मिळवणे, कागदपत्रे गोळा करणे आणि बँकेत उपस्थित राहणे जिकिरीचे ठरत आहे. काही वारस अल्पवयीन असल्याने स्वतंत्र बँक खाते उघडण्याची प्रक्रियाही अडचणीची ठरत आहे. परिणामी, पात्र लाभार्थींना कर्जमाफीसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एका वारसाच्या खात्यावर
लाभ देण्याची मागणी
मृत शेतकऱ्याच्या सर्व वारसांची संमती आणि प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांपैकी एका वारसाची मुख्य वारस म्हणून नोंद करण्याची तरतूद एसओपीमध्ये करावी, अशी मागणी बिक्कड यांनी केली आहे. सर्व वारसांची संमती घेतल्यानंतर पात्र कर्जमाफीचा लाभ एका वारसाच्या कर्जखात्यावर वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. अशा बदलामुळे वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होईल आणि बँकांतील प्रक्रियाही सुलभ होईल. कर्जमाफीचा निर्णय होऊनही नियमांच्या कचाट्यात अडकणाऱ्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि एसओपीमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी बिक्कड यांनी केली आहे.