पटोले आणि देशमुख यांनी लातूरात स्वबळावर लढवून दाखवाव; संभाजीराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

local swarajya sanstha elections Shivajirao Patil Nilangekar Challenge to nana patole and Amit Deshmukh

पटोले आणि देशमुख यांनी लातूरात स्वबळावर लढवून दाखवाव; संभाजीराव पाटील

निलंगा : ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या वल्गना काँग्रेस करीत आहे. राज्यात काँग्रेसकडून काय निर्णय होईल तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी किमान लातूर जिल्ह्यात तरी स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले.

तालुक्यातील काही भाजप कार्यकर्त्यांचा शुक्रवारी (ता. चार) मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. त्याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजपमुक्त करू, असे वक्तव्य केले होते. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर त्यांनी केले. याबाबत माजीमंत्री निलंगेकर यांना कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘‘राजकारणात सोबत काम करताना व्यक्ती म्हणून सोडून गेल्यानंतर वेदना तर होत असतातच.

मात्र, राजकारणात महत्त्वाकांक्षा निर्माण झाली की, काही कार्यकर्ते पक्षांतर करतात. त्याबद्दल मी काही बोलणार नाही. काँग्रेसने राज्यात सोडा किमान लातूर जिल्ह्यात तरी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात’’, असेही ते म्हणाले. ‘‘महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणापासून वंचित राहिला आहे. यास सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार आहे. मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एक चकार शब्द काढला नाही’’, अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: Local Swarajya Sanstha Elections Shivajirao Patil Nilangekar Challenge To Nana Patole And Amit Deshmukh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top