रिक्षात विसरलेली दागिन्यांची
पर्स पोलिसांनी मिळवून दिली
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १० : रुग्णालयातून निघाल्यानंतर अडीच तोळे दागिने असलेली पर्स रिक्षातच विसरल्याचे लक्षात येताच बायजीपुरा येथील तहसीन आसिफ शेख घाबरून गेल्या. त्यांनी तत्काळ जिन्सी पोलिस ठाण्यात धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला. पोलिस आयुक्तालयातील ‘कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर’मधील (सीसीसी) कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कौशल्याच्या बळावर अवघ्या काही तासांत पर्स शोधून शेख यांना सुपूर्द केली. ही कामगिरी सोमवारी (ता. सात) करण्यात आली.
शेख या सोमवारी अपेक्स हॉस्पिटल येथून रिक्षात बसल्या होत्या. नियोजित स्थळी उतरल्यानंतर काही वेळाने त्यांची पर्स रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. आयुक्तालयातील महिला पोलिस अंमलदार वर्षा गोडबोले, मंदा तारू आणि उषा काळे यांनी आकाशवाणी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित रिक्षाचा क्रमांक शोधून काढला. रिक्षाचा क्रमांक मिळाला असला तरी मालकाचा मोबाइल क्रमांक ऑनलाइन उपलब्ध होत नव्हता. यावर पोलिस अंमलदार चेतन गारदे यांनी रिक्षावर आधी फाडलेल्या एका दंडाच्या पावतीवरून मालकाचा मोबाइल नंबर व पत्ता शोधून काढला. पोलिसांनी संपर्क साधताच रिक्षाचालक लगेचच आयुक्तालयात पर्स घेऊन हजर झाला.