

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर/बजाजनगर: गॅसचे भले मोठे कॅप्सूल टॅंकर अंधारात यायचे. एका विशिष्ट ठिकाणी हे टँकर थांबवले जायचे. तिथे टोळी तयारच असायची. टँकरचे आधीच सील तोडलेल्या एका बाजूला रबरी व्हॉल्व्ह लावून तो दुसऱ्या बाजूला रिकाम्या सिलिंडरला लावायचा अन् हळूहळू घरगुती, व्यावसायिक सिलिंडर चोरून भरायचे.
कित्येक दिवसांपासून अंधारात चालणारा हा ‘उद्योग’ इथल्या जिल्हा पुरवठा विभागाला आजपर्यंत कधी दिसला नाही. कदाचित ‘अर्थपूर्ण’ व्यवहारामुळे हे होत असेल! त्यामुळे चक्क मुंबईच्या राज्य दक्षता पथकाला जिल्ह्यात येऊन काळ्या बाजारात जाणाऱ्या गॅसवर कारवाई करावी लागली! मागील महिनाभरापासून गॅस सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या असताना जिल्हा प्रशासन चक्क झोपेत होते, यावर या कारवाईने शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार ‘लीड’ देऊनही शहरात कारवाई केली जात नव्हती, हे आणखी विशेष!