
सोयगाव : सोयगाव तालुक्यात जवळा आणि नांदातांडा या दोन नवीन संसर्ग केंद्रात आठ जनावरांना लम्पीची बाधा झाल्याने या संसर्ग केंद्रातील पाच कि.मी.च्या त्रिज्येचा परिसरातील १७ गावांसाठी बुधवारपासून लसीकरण हाती घेण्यात येणार आहे. तालुक्यातील फर्दापूर, जवळा आणि नांदातांडा या संसर्ग केंद्रात आतापर्यंत एक हजार ९०० जनावरांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुधन अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी दिली आहे. बुधवारपासून सहा हजार दोनशे जनावरांना संसर्ग केंद्रातील १७ गावात लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी परभणी पशू महाविद्यालयाच्या चार तज्ज्ञांचे पशू वैद्यकीय पथक सोयगाव तालुक्यात ठाण मांडून आहे.
दरम्यान, लम्पी साथरोग नियंत्रणासाठी उपआयुक्त पुणे येथील मुख्यालयातील रोग अन्वेषण विभाग औंध येथील डॉ. कल्पना मुगळीकर (उप आयुक्त पशू संवर्धन), डॉ. गौरीशंकर हुलसुरे (उप आयुक्त पुणे) यांच्या पथकाची सोयगाव तालुक्यात नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. या नियंत्रण अधिकाऱ्यांनी संसर्ग केंद्रांना भेटी देऊन बाधित जनावरांची उपचाराची खात्री करणे तसेच आवश्यकता नुसार पशू पालकांना मार्गदर्शन करावे,असे आदेशात म्हटले आहे.
तालुक्यात केवळ एक बैल लम्पी सापडला होता. संशयित जनावराचे रक्ताचे व गाठींचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तो पॉझिटिव्ह आला आहे. आता बैल पूर्णपणे बरा आहे. बाधित परिसराच्या पाच कि.मी. परिघामध्ये प्रतिबंध लसीकरण होत आहे. पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.
- राजशेखर दडके, सहाय्यक आयुक्त, पशू विभाग
दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लम्पी आजार रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. त्वरित उपाययोजना न झाल्यास दूग्ध व्यवसाय कोलमडून पडू शकतो. प्रादुर्भाव रोखण्यासाठी टास्क फोर्स गठित करावे.
- बाबासाहेब गायके, दूध व्यावसायिक