खासगी लग्झरी बससेवेला ‘एसटी’चा लक्झरी पंच!

खासगी लग्झरी बससेवेला ‘एसटी’चा लक्झरी पंच!
Published on: 
खासगी ट्रॅव्हल्सला ‘एसटी’चा लक्झरी पंच! ---------------- -ताफ्यात दाखल होणार २०० अत्याधुनिक एसी व्होल्वो -२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या मार्गांवर धावणार सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ६ ः वातानुकुलीत, आरामदायी आसने, शयनयान सुविधांमुळे खासगी ट्रॅव्हल्सकडे वळणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एसटीच्या सेवेकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाने पाऊल उचलले आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर २०० अत्याधुनिक एसी व्होल्वो बस सुरू करून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतानाच खासगी ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी तयारी सुरू केली आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच तब्बल २०० अत्याधुनिक एसी व्होल्वो बस दाखल होणार असून, या माध्यमातून लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचे नियोजन आहे. त्यात २५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या, पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी ४५ आसनी आरामदायी बस चालविण्याचा प्रस्ताव आहे. प्रवाशांची मागणी, मार्गाचे अंतर, प्रवासाचा कालावधी, सध्या उपलब्ध असलेल्या एसटी सेवा, आर्थिक व्यवहार्यता या बाबींचा विचार करून या बसमार्ग निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे सर्व २०० बस नेमक्या कोणत्या मार्गांवर धावतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी कंपन्यांच्या एसी, आरामदायी तसेच शयनयान बससेवांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. आधुनिक सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था आणि वातानुकूलित प्रवासामुळे प्रवासी या सेवांना पसंती देतात. या प्रवासी वर्गाला एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून आधुनिक सुविधांनी सज्ज बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्या सेवांत तिकीट आरक्षणासाठी डिजिटल माध्यमांना प्राधान्य दिले जाणार आहे. एसटीच्या ऑनलाइन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजीटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. सध्या एसटीकडून अधिकृत मोबाइल ॲप, ऑनलाइन ई-तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. --- प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी खासगी संस्थेची मदत केवळ अत्याधुनिक बस उपलब्ध करून न थांबता प्रवाशांना चांगली ग्राहकसेवा, आतिथ्याचा अनुभव देण्यावरही भर दिला जाणार आहे. यासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून आतिथ्य व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. नव्या एसी व्होल्वो सेवांसाठी प्रवाशांकडून किती भाडे आकारले जाणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर झाली नाही. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य पात्र प्रवाशांना सध्या एसटीच्या विविध योजनांनुसार मिळणाऱ्या सवलती नव्या व्होल्वो व शयनयान सेवांना लागू असतील की नाही, याबाबतही स्वतंत्र निर्णय होणे अपेक्षित आहे. --- खासगी ट्रॅव्हल्सच्या वर्चस्वाला आव्हान राज्यभर पसरलेले एसटीचे विस्तीर्ण जाळे आणि प्रवाशांचा विश्वास ही महामंडळाची प्रमुख ताकद आहे. या पारंपरिक विश्वासाला अत्याधुनिक एसी बस, डिजीटल आरक्षण, सुधारित ग्राहकसेवेची जोड देऊन खासगी लक्झरी ट्रॅव्हल्सच्या वाढत्या स्पर्धेस उत्तर देण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. त्यामुळे नव्या व्होल्वो सेवांकडे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे लक्ष कितपत वेधले जाते, याकडे आता प्रवासी आणि वाहतूक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com