esakal | 'महाकार्गो'चा मोठा पल्ला; अडीच कोटींचा गल्ला!
sakal

बोलून बातमी शोधा

mahacargo

'महाकार्गो'चा मोठा पल्ला; अडीच कोटींचा गल्ला!

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद: कायम तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) महाकार्गो सेवेने दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरु झालेल्या औरंगाबाद विभागाच्या मालवाहतूक सेवेने वर्षभरात तब्बल अडीच कोटींचा पल्ला गाठला आहे. सुरक्षीत आणि विश्वासपूर्ण सेवेमुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आधीच नित्य महातोट्यात अडकलेल्या एसटी महामंडळाला कोरोनाने आणखी मोठा फटका दिला. महामंडळातर्फे कोरोनापूर्वी दररोज प्रवासी वाहतुकीसाठी सुमारे १६ हजार नियते चालविण्यात येत होती. मात्र लॉकडाउनमुळे प्रवासी वाहतूक ठप्प झाली. प्रवासी संख्या निम्म्यावर आल्याने महामंडळाचा प्रचंड तोटा वाढणार, हे लक्षात घेऊन महामंडळाला उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागले. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनातून सावरण्याच्या उद्देशाने मे २०२० मध्ये मालवाहतूक अर्थात महाकार्गो सेवा सुरु केली.

महामंडळाच्या ताफ्यातील तीन हजार वाहनांनी आयुर्मान पूर्ण केले आहे. आयुर्मान पूर्ण केलेल्या बसची अंतर्गत रचना बदलून मालवाहतुकीसाठी वापर सुरू करण्यात आला. एसटीच्या औरंगाबाद विभागात आयुर्मान संपलेल्या तीस बसची अंतर्गत रचना बदलून ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. जुन्या बसचे ट्रक झाले आहेत. या ट्रकद्वारे मे २०२० पासून ते जून २०२१ पर्यंत तब्बल दोन कोटी ३३ लाख, २४ हजार २३८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या ट्रकनी वर्षभरात साधारण ५ लाख ६९ हजार ४०४ किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. सध्या पहिल्या शंभर किलोमीटरपर्यंत ४८ रुपये प्रति किलोमीटर, शंभर ते २५१ किलोमीटर पर्यंत ४६ रुपये प्रतिकिलोमीटर तर त्यापुढे ४४ रुपये किलोमीटर प्रमाणे मालवाहतूक केली जाते. औरंगाबाद विभागाला सरासरी ४०.९६ पर किलोमीटर याप्रमाणे उत्पन्न मिळाले आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत सहायक पीआयला दीड लाखांचा गंडा!

बंद बॉडीच्या ट्रकला पसंती
महाकार्गो सेवेत बंद बॉडीचे ट्रक आहेत. त्यामुळे पावसाने माल भिजण्याची किंवा खराब होण्याची शक्यता नसते. या सुविधेमुळे विविध कारखानदार, शेतकरी, व्यापारी माल वाहतुकीसाठी सुरक्षीत, किफायतशीर महाकार्गोला प्रतिसाद देत आहेत, असे सांगण्यात आले.

एसटी महामंडळाची महाकार्गो सेवा किफायतशीर, सुरक्षित, विश्वासार्ह आहे. त्यामुळे सुरक्षीत माल वाहतुकीसाठी या सेवेची निवड केली जात आहे. अधिकाधिक मालवाहतूक करण्याच्या दृष्टीने महामंडळाची यंत्रणा सज्ज आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, औरंगाबाद विभाग.

loading image