निधीअभावी महाडायलिसीस
मोफत सेवा तात्पुरती बंद
--------
गरजू रुग्ण, कुटुंबीयांत संताप
पूर्णा, ता. १२ (बातमीदार): राज्य शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे महाडायलिसिस अंतर्गत दिल्या जाणारी मोफत डायलिसिस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. यामुळे डायलिसीसची नियमित गरज असलेल्या रुग्णांची हेळसांड होणार आहे. याबाबत गरजू रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात महाडायलिसिस प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असून, किडनी निकामी झालेल्या लाभार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना, या प्रकल्पांतर्गत मोफत डायलिसीस सेवा दिली जात आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यात एकूण १०८ महाडायलिसीस केंद्रे कार्यरत आहेत. त्याप्रमाणे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण उपचार घेत होते. आता त्यांना एक दिवसाआड नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागत आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पासाठी आवश्यक निधी प्राप्त न झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणात देयके थकीत असल्यामुळे प्रकल्प सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. आर्थिक अडचणी असूनही लाभार्थ्यांचे उपचार खंडित होऊ नयेत यासाठी आतापर्यंत मोफत डायलिसीस सेवा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, निधी मिळण्यास सतत होत असलेला विलंब आणि पुढील खर्च करणे शक्य नसल्यामुळे महाडायलिसीस प्रकल्प व्यवस्थापनाला महाडायलिसीस केंद्रांचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
(((चौकट)))
डायलिसीस उपचार हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यात खंड पडल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी सरकारने घेत पर्याय शोधून डायलिसीसची व्यवस्था करावी.
-देवराव खंदारे,
माजी नगरसेवक, पूर्णा
--------------------