महाडीबीटी २.० वर शिष्यवृत्ती
अर्ज नोंदणीला अल्प प्रतिसाद
जिल्ह्यात केवळ ४०० विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रमाणात लक्षणीय घट
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता.२ ः अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार देणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांच्या अर्ज नोंदणीला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अद्ययावत करण्यात आलेल्या महाडीबीटी २.० प्रणालीवर जिल्ह्यातील केवळ ४०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी असल्याची स्थिती आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी https://mahadbt2.maharashtra.gov.in](https://mahadbt2.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी नोंदणीला गती देऊन एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे. नोंदणीचे प्रमाण घटल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
.........
महाविद्यालयांना तत्काळ कारवाईचे आदेश
कवले यांनी स्पष्ट केले की, महाविद्यालयांनी आपल्या संस्थेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अर्जांचा आढावा घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्यांना मार्गदर्शन करून ऑनलाइन अर्ज भरण्यास सूचित करावे. तसेच, महाविद्यालयांकडे प्राप्त अर्जांची शासन निर्णयातील निकषांनुसार परिपूर्ण छाननी करून ते अर्ज विनाविलंब समाज कल्याण कार्यालयाकडे अग्रेषित करावेत. शिष्यवृत्ती ही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची योजना असल्याने केवळ अर्ज न भरल्यामुळे किंवा महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. सर्व महाविद्यालयांनी जबाबदारीने कार्यवाही करून पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.