डिसेंबरमध्ये तीनदिवसीय
राज्यस्तरीय खगोल संमेलन
----------------
-परभणीत दा. कृ. सोमण उद्घाटक; एल. के. कुलकर्णींना जीवनगौरव
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २२ : मराठी खगोल अभ्यास मंडळ नांदेड, परभणी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ डिसेंबरदरम्यान परभणीत १५ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात हे संमेलन होणार आहे.
प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, समारोपप्रसंगी परभणीचे सुपुत्र, अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. मयूर महाजन उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध खगोल अभ्यासक व भूगोलकोशकार एल. के. कुलकर्णी यांना या संमेलनात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या जिज्ञासू आणि हौशी अभ्यासकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, शहरी आणि ग्रामीण भागातील युवा अभ्यासक व संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, हा संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. तीन दिवसांच्या या संमेलनात खगोलीय घटनांचे निरीक्षण, माहितीचे विश्लेषण, खगोलशास्त्रातील आगामी आव्हाने, उपलब्ध संधी यांवर तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चा होणार आहे. मिथुन राशीतील उल्कावर्षावाचे निरीक्षण करण्याची संधीही अभ्यासकांना मिळणार आहे. संमेलनात राज्यभरातील १०० ते २०० खगोल अभ्यासक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी स्थानिक संयोजन समिती कार्यरत असल्याचे आयोजकांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. श्रीनिवास औंधकर, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. पी. आर. पाटील, सुधीर सोनुनकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
----------