औरंगाबादचे तब्बल तीन मंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Cabiet Expansion

औरंगाबादचे तब्बल तीन मंत्री

औरंगाबाद - महाराष्ट्रातील शिंदे गट व भाजप युतीच्या एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप मिळाले. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे या तब्बल तीन जणांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले. तर तानाजी सावंतांच्या रुपाने उस्मानाबाद जिल्ह्याला स्थान मिळून मराठवाड्यातील एकूण चार जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.

शिवसेनेच्या बंडखोरीत औरंगाबाद जिल्ह्यातील सहापैकी तब्बल पाच आमदार सहभागी झाले होते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यात महत्वाचे योगदान या जिल्ह्याने दिले होते. म्हणजे शिवसेनेच्या मराठवाड्यातील उभारणीत व तिच्या पाडावातही या जिल्ह्याने महत्वाची भुमिका बजावली आहे. आज मंत्री झालेले तीनही मंत्री दिग्गज आहेत. संदीपान भुमरे हे तब्बल पाचवेळा पैठण या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार झाले. ते १९९५ पासून आतापर्यंत निवडून येत आहेत. अपवाद केवळ २००९ चा. कारखाना चिटबाॅय, ग्रामपंचायत, पं.स. सदस्य पाचवेळा आमदार ते सलग दोन वेळा कॅबिनेट मंत्रिपद अशी त्यांची जोरदार राजकीय कारकीर्द आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आम्ही "रंकाचा राव" केले, अशी मर्दुमकी उध्दव ठाकरे यांची शिवसेना सांगत असताना ती याच भुमरे यांचे उदाहरण सतत देत असायची. बंडात उघडपणे पाठिंबा दिलेल्या या अनुभवी सैनिकाला पुन्हा एकदा संधी देऊन शिंदे गटाने त्यांच्या कारकिर्दीचा गौरव एका अर्थाने केला आहे.

मंत्रिमंडळात शपथ घेतलेले दुसरे मंत्री अब्दुल सत्तार हे एक वादळी व वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. अगदी टीईटी घोटाळ्यात एक दिवसांपूर्वीच नाव येऊनही त्यांनी करामत करत आपले मंत्रिमंडळात स्थान पक्के केले. काॅंग्रेस व्हाया शिवसेना व आता शिवसेना शिंदे गट असा एका मुस्लिम नेत्याचा राजकीय प्रवास भल्याभल्यांना चकित करणारा आहे. मुस्लिम समाजातील या नेत्यांचे काॅग्रेसी असते कुणाला फारसे वावगे वाटले नव्हते. पण मागच्या (२०१९) च्या निवडणुकीपूर्वी त्यांचे पक्षाशी बिनसले आणि त्यांनी थेट हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनेशी घरोबा केला. तिकीट मिळवले व सिल्लोड पुन्हा जिंकून आपणच या 'सिल्लोड संस्थान'चा राजा आहोत, असे सिध्द केले. "जिथे सत्ता तिथे 'सत्ता'र" अशी स्वत:ची खुलेआम स्तुती करायलाही मग ते मागेपुढे पाहत नाहीत. परवाच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सिल्लोडला असा जंगी सत्कार घडवून आणला की पाहायची सोयच नाही. अगदी टीईटीच्या घोटाळ्यात त्यांना अडकविण्याचा प्रयत्न हाणून पाडत त्यांनी आपले स्थान पक्के केले.

औरंगाबादचे आणखी एक मंत्री भाजपचे अतुल सावे. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून ते सलग दोन वेळा निवडून आले. त्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश पहिल्यापासून निश्चित मानला गेला होता. फडणवीस यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शिवाय भाजपच्या ओबीसी या जातीय समीकरणातही ते पक्के बसतात. त्यांनी मागच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उद्योग राज्यमंत्री म्हणून काम केले होते. तसा त्यावेळी त्यांना कमी कार्यकाळ लाभला. औरंगाबाद शहरासाठी १६०० कोटींची पाणीयोजना आणण्याचे श्रेय घेत त्यांनी दुसर्यांदा आमदारकी मिळवली. आता औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्याचे ध्येय बाळगून त्यांना कॅबिनेटमध्ये पदोन्नती मिळाली आहे. या मोहिमेत त्यांना शिंदे गट कसे सहकार्य करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट नाराज आहेत. खरे पाहता शिंदे यांना बंडखोरीसाठी प्रवृत्त करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. तब्बल सलग तीन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले. तसेच गुवाहाटीतून उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून बंडखोरांची भुमिका जाहिरपणे मांडणारे ते पहिलेच आमदार होते.‌ शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे फायरब्रॅंड नेते संजय राऊत यांच्यावर विखारी शब्दांत टीका करतही त्यांनी लक्ष वेधले होते. एवढे असूनही त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परंड्याचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांना स्थान मिळाले. तेही हे सरकार अस्तित्वात यावे म्हणून पुढाकार घेणारांपैकी आघाडीवर होते. उध्दव सरकारमध्ये स्थान न मिळाल्याने ते मागच्या मविआ सरकारवरच पहिल्यापासूनच नाराज होते. ती नाराजी त्यांनी अनेकदा जाहीरही केली होती. त्यामुळे या सरकारमध्ये त्यांचा समावेश निश्चित मानला जात होता.

यांना हुलकावणी...

मराठवाडा विभागात औरंगाबाद व उस्मानाबाद या नवनामांतराने प्रसिद्ध झालेल्या जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. उर्वरित लातूर, बीड, नांदेड, जालना, परभणी व हिंगोली या तब्बल सहा जिल्ह्यांना स्थान मिळू शकले नाही. लातूर, नांदेड व बीड हे तसे सतत सत्ता मिळवत असलेले जिल्हे. मात्र तेही यात स्थान मिळवू शकले नाहीत. बीड जिल्ह्यातून माजी मंत्री पंकजा मुंडे, लातूरमधून संभाजी पाटील निलंगेकर व अभिमन्यू पवार, उस्मानाबाद जिल्ह्यातून राणा जगजितसिंह पाटील, औरंगाबादेतून प्रशांत बंब आदींची चर्चा होती. आता ही चर्चा दुसर्या मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत कायम होत राहणार आहे.

Web Title: Maharashtra Cabinet Expansion Abdul Sattar Sanjay Shirsat Tanaji Sawant Atul Save

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..