शेतातूनच एकनाथ शिंदेंना
दाखविले करपलेले पीक
पालकमंत्र्यांकडून पाहणी; व्हिडिओ कॉलद्वारे उपमुख्यमंत्र्यांशी साधला संपर्क
-----
धाराशिव, ता. १७ : पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक यांनी गुरुवारी (ता. १७) धाराशिव तालुक्यातील खेड येथील शेतकरी ज्ञानेश्वर टकले यांच्या शेताला भेट देऊन करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. टकले यांनी १०० टक्के पीक हातचे गेल्याची व्यथा मांडत शासनाने भरीव आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
-----
उपमुख्यमंत्र्यांना दाखविले नुकसान
नुकसानीचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी सरनाईक यांनी शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त सोयाबीनचे पीक प्रत्यक्ष दाखविले. शिंदे यांनी शेतकरी ज्ञानेश्वर टकले तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, निश्चितपणे मदत केली जाईल, असा दिलासा त्यांनी दिला. तसेच जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
दौऱ्यात पालकमंत्र्यांनी वासुदेव मेटे यांच्या नुकसानग्रस्त उसाची पाहणी केली. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
-----
OSM26B07023
धाराशिव : तालुक्यातील खेड येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री प्रताप सरनाईक. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार व अन्य.