राज्य नाट्य स्पर्धेसाठी मागविल्या
२५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेशिका
---
लातूर, ता. २ : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबरपासून विविध १० केंद्रांवर तर हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबरपासून आयोजित करण्यात येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असेही संचालनालयाने कळविले आहे.
-----