वृद्ध कलावंत मानधन योजनेत गैरप्रकाराचा आरोप
अपात्र व्यक्तींना पैसे घेऊन पात्र ठरविल्याची तक्रार; चौकशीची मागणी
जाफराबाद, ता. ६ : राज्य शासनाच्या वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजनेत अपात्र व्यक्तींना पैसे घेऊन पात्र ठरविले जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लोककलावंत नानाभाऊ परिहार यांनी केली आहे.
शासनाची कलावंतांसाठी असलेली कल्याणकारी योजना दलालांच्या विळख्यात सापडली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असून, यामुळे खऱ्या कलावंतांवर अन्याय होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया तालुक्यात व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाकडून वयाची पन्नाशी ओलांडलेल्या, आपले जीवन कलेवर अवलंबून असलेल्या तसेच कला क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वृद्ध कलावंत व साहित्यिकांना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाते. यासाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यानंतर शासन नियुक्त समितीमार्फत अर्जदारांच्या कलागुणांची चाचणी घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाते.
मात्र, जिल्ह्यासह तालुक्यात या योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. चाचणीच्या वेळी कलावंतांनी सादर केलेले मूळ अर्ज, प्रस्ताव आणि संबंधित कागदपत्रांची योग्य पडताळणी केली जात नसल्याचा आरोप आहे.