जिल्ह्यात १ लाख २९ हजार कर्जखात्यांत १ हजार २४ कोटी रुपये जमा
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ३३९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत १ हजार २४ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. अद्यापही जिल्ह्यातील २६ हजार ८५१ शेतकऱ्यांची ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) करणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली.
कर्ज योजनेच्या पोर्टलवर जिल्ह्यातील विविध बॅंकांनी एकूण १ लाख ८९ हजार १७९ शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे. यापैकी १ लाख ६४ हजार १०४ शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी ई-केवायसीसाठी जारी करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार २५३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ४ नोव्हेंबर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ हजार ७०९ कर्जखात्यांमध्ये ४० कोटी ५५ लाख रुपये, तर इतर बँकांच्या २७ हजार ३६२ कर्जखात्यांमध्ये २८४ कोटी ५६ लाख रुपये जमा झाले आहेत. अशा एकूण ३६ हजार ७१ कर्जखात्यांमध्ये ३२५ कोटी ११ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.
-----------
ई-केवायसी करणे बंधनकारक
योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लाभार्थी याद्या जिल्ह्यातील सर्व बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रसिद्ध झालेल्या यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी. त्यानंतर संबंधित आपले सरकार सेवा केंद्रात जाताना मूळ आधार कार्ड, संबंधित क्रमांक व बचत खात्याचे पासबुक सोबत न्यावे आणि ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी.
------
((कोट))
ई-केवायसी करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करून घ्यावी, त्याशिवाय कर्जाच्या यादीत नाव आलेले असले तरी याचा लाभ मिळणार नाही. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा.
- समृत जाधव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
----