परभणीच्या लघू-मध्यम प्रकल्पांची पाण्यासाठी धडपड

परभणीच्या लघू-मध्यम प्रकल्पांची पाण्यासाठी धडपड
Published on
लघू-मध्यम प्रकल्प तहानलेलेच ---------- जिल्ह्यात चार लघू तलाव जोत्याखाली, दोन मध्यम प्रकल्पांत १० टक्केच साठा सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ३१ : पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील लघू आणि मध्यम सिंचन प्रकल्पांची पातळी चिंताजनक स्थितीत आहे. पाणलोट क्षेत्रात महिनाभरापासून दमदार पाऊस न झाल्याने प्रकल्पच भर पावसाळ्यात तहानलेले आहेत. त्यातच वाढलेले बाष्पीभवन, सुरू असलेला उपसा यामुळे उपलब्ध साठाही झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील चार लघू तलावांचा साठा जोत्याखाली गेला असून दोन मध्यम प्रकल्पांत मिळून अवघा १० टक्के साठा शिल्लक आहे. गुरुवारी (ता.२७) झालेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील लघू प्रकल्पांत सरासरी ७.४९० दलघमी म्हणजेच केवळ १२ टक्के साठा शिल्लक होता. विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील देवगाव, कवड दहेगाव, सोनपेठ तालुक्यातील नखातवाडी या चार लघू सिंचन तलावांचा साठा जोत्याखाली गेल्याने या प्रकल्पांची पाणीस्थिती अक्षरशः तळाला पोचली आहे. परभणी तालुक्यातील पेडगाव लघू तलावात ३१ टक्के साठा आहे. जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे ४ टक्के, बेलखेडा १ टक्का, वडाळी १० टक्के, चारठाणा १ टक्का, चिंचोली ३ टक्के, आडगाव ६ टक्के, केहाळ ४ टक्के, भोसी ३ टक्के आणि मांडवी येथे ७ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. मानवत तालुक्यातील आंबेगाव लघू तलावात ३१ टक्के, तर पाथरी तालुक्यातील झरी लघू तलावात सर्वाधिक ८६ टक्के साठा आहे. गंगाखेड तालुक्यातील टाकळगावमध्ये २ टक्के, कोद्री २१ टक्के, राणीसावरगाव ३८ टक्के, पिंपळदरी ३९ टक्के, डोंगरपिंपळा ४ टक्के आणि भेंडेवाडी येथे अवघा २ टक्के पाणीसाठा आहे. पालम तालुक्यातील तांदुळवाडी तलावात ३५ टक्के, तर मंठा तालुक्यातील पाडाळी लघू प्रकल्पात ९ टक्के साठा आहे. गतवर्षी याच दिवशी लघू प्रकल्पांमध्ये सरासरी १४.७१ दलघमी म्हणजेच ३२.७७ टक्के पाणीसाठा होता. यंदाची स्थिती पाहता गतवर्षीच्या तुलनेत पाण्याची परिस्थिती किती खालावली आहे, हे स्पष्ट होते. --- मध्यम प्रकल्पही तळाशी जिल्ह्याच्या दोन महत्त्वाच्या मध्यम प्रकल्पांची स्थितीही फारशी दिलासादायक नाही. करपरा आणि मासोळी या दोन्ही प्रकल्पांत मिळून सरासरी ५.१२२ दलघमी म्हणजे केवळ १० टक्के साठा आहे. करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता २८.८२० दलघमी असून उपयुक्त साठवण क्षमता २४.९०० दलघमी आहे. गुरुवारी या प्रकल्पात अवघा १.०४३ दलघमी म्हणजे ४ टक्के साठा होता. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता ३४.०८५ दलघमी असून उपयुक्त साठवण क्षमता २७.१४१ दलघमी आहे. या प्रकल्पात ४.०७९ दलघमी म्हणजे १५ टक्के साठा नोंदविण्यात आला. म्हणजेच, जिल्ह्याच्या दोन मध्यम प्रकल्पांपैकी करपरा प्रकल्पाची स्थिती विशेषतः गंभीर बनली आहे. --- गतवर्षी तुडुंब; यंदा गाठला तळ गतवर्षी २७ ऑगस्टला करपरा मध्यम प्रकल्प तुडुंब १०० टक्के, तर मासोळी प्रकल्पात ४३ टक्के साठा होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांत यावेळी सरासरी ७०.०८ टक्के साठा नोंदवला गेला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साठ्यात झालेली मोठी घट ही केवळ आकडेवारी नसून आगामी काळातील पिण्याचे पाणी, सिंचन आणि रब्बी हंगामाच्या नियोजनासमोरील मोठा इशारा ठरत आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास जिल्ह्यातील जलसाठ्यांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com