पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात
तातडीने मदतीसाठी आमदार नारायण कुचे यांची मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांकडे मागणी
बदनापूर, ता. ११ (बातमीदार) : पावसाअभावी जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद व तूर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आमदार नारायण कुचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे मंगळवारी (ता. आठ) निवेदनाद्वारे केली.
जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ १३ ते २० टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. पावसातील मोठ्या खंडामुळे अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला अपेक्षित फुलोरा व शेंगा न आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बदनापूर व अंबड तालुक्यांतील विविध गावांमध्ये पिकांची पाहणी केली असता पिकांची स्थिती चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे तसेच मशागतीसाठी मोठा खर्च केला आहे. अनेकांनी कर्ज काढून खरीप हंगामाची तयारी केली, मात्र पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.