LTR26B15643- स्पर्धेचा लोगो
---
लातुरात आजपासून
हौशी मराठी नाट्यस्पर्धा
-------
कलाकारांमध्ये उत्सुकता; प्रेक्षकांना १५ नाटकांची मेजवानी
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १५ : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेला लातूर केंद्रावर सोमवारपासून (ता. १६) सुरवात होत आहे. यानिमित्ताने सलग १५ दिवस १५ नाटकांची मेजवानी लातुरातील नाट्यरसिकांना ऐन दिवाळीच्या सुट्यात लाभली आहे. त्यामुळे रसिकांबरोबरच कलाकारांमध्ये स्पर्धेबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात होत असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. लातुरातही तसाच प्रतिसाद आहे. यंदा १५ नाट्यसंघांनी या स्पर्धेत सहभाग आहे. लातूर केंद्रावरील यंदाची राज्य नाट्यस्पर्धा अनेक अर्थाने लक्षवेधी ठरत आहे. नाट्यसंघांचा विक्रमी सहभाग, नव्या कलावंतांची लक्षणीय भागीदारी, स्त्री कलावंतांचा वाढता प्रतिसाद, नव्या आशयाच्या नवनवीन संहिता, स्त्री कलावंतांचे दिग्दर्शनातील पदार्पण अशा वैशिष्ट्यांमुळे लातूर केंद्र चर्चेचा विषय ठरले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून एकाहून एक सरस नाट्यप्रयोगांची पर्वणी लातूरकर नाट्य रसिकांना उपलब्ध झाली आहे. दगडोजी देशमुख सभागृह येथे सादर होणारे स्पर्धेतील नाट्यप्रयोग सायंकाळी सातला सुरू होणार आहेत. दररोज एक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. त्यामुळे स्पर्धा ३० नोव्हेबरपर्यंत चालणार आहे. प्रेक्षकांनी नाट्यप्रयोगांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले.
---
या नाटकांचा सहभाग
या स्पर्धेत अनुक्रमे ‘लाडू’, ‘त्रिकोणाची चौथी बाजू’, ‘देवनवरी’, ‘पगला घोडा’, ‘टु इज कंपनी’, ‘आणि हे शहर सुद्धा’, ‘मृत्यू आधीच झाला होता’, ‘सृजनमयसभा’, ‘आवर्तन’, ‘रंगलेल्या गालाचा मुका’, ‘बेईमानी’, ‘खेळीमेळी’, ‘वात्सल्यम’, ‘नथिंग टु से’, ‘चाफा सुंगधी’ ही नाटके सादर होणार आहेत. विविध विषयांवर आधारित या नाटकाच्या सध्या रंगीत तालमी शहरात ठिकठिकाणी सुरू आहेत.