ऑगस्टअखेर २८.३ टक्के कमी पाऊस
-----
लोहारा, तुळजापूर, उमरगा, धाराशिवमध्ये ३२ ते ४८ टक्केची तूट
-------
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २ ः छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पर्जन्यमान अहवालानुसार, जिल्ह्यात जूनपासून ते ऑगस्टअखेरपर्यंत एकूण सरासरीच्या ७१.७ टक्के म्हणजेच ३०४.३ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. सरासरीच्या तुलनेत २८.३ टक्क्यांची तूट पडली आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ४८ टक्के पाऊस कमी झाला असून, त्यातही ऑगस्ट महिन्याने मोठी निराशा करीत जिल्ह्याला संकटात टाकले आहे.
जून ते ऑगस्ट तीन महिन्यांच्या सरासरी ४२४.६ मिमी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात ३०४.३ मिमी पाऊस झाला आहे. मागीलवर्षी याच कालावधीत ५०८.३ मिमी म्हणजेच तब्बल ११९.७ टक्के पाऊस कोसळला होता. यंदा त्याच्या उलट स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पडलेल्या कमी पावसातही तालुकानिहाय मोठी असमानता आहे. एकीकडे भूम आणि कळंब तालुक्यांनी पावसाची टक्केवारी ९० टक्क्यांच्या जवळ नेली आहे, तर दुसरीकडे लोहारा आणि तुळजापूर तालुक्यांत कमी पाऊस झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत भूममध्ये सर्वाधिक ९४.८ टक्के, तर लोहारा तालुक्यात सर्वात कमी ५१.७ टक्के पाऊस झाला आहे.
-----
((चौकट))
लोहारा, तुळजापूर, उमरगा, धाराशिवमध्ये बिकट स्थिती
जिल्ह्यात सर्वात बिकट परिस्थिती लोहारा, तुळजापूर, उमरगा आणि धाराशिव तालुक्यांत आहे. लोहारा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ४८.३ टक्के पावसाची तूट आहे. तुळजापूर तालुक्यात ४३ टक्के, तर उमरगा आणि धाराशिव तालुक्यांत प्रत्येकी ३२ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळजन्य स्थिती निर्माण झालेली आहे.
----
((चौकट))
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (ऑगस्टअखेरपर्यंत)
तालुका... पडलेला पाऊस (मिमी)...टक्के
भूम...३६९.३...९४.८
कळंब...३८९.२...८९.९
परंडा...२६१.८...८४.४
वाशी...३४५.७...८०.२
धाराशिव...३१०.६...६८
उमरगा...२६८.८...६८
तुळजापूर...२५७.५...५७
लोहारा...१९९.६...५१.७
................
((चौकट))
गेल्यावर्षीच्या तुलनेत चित्र काय?
चालूवर्षी जून ते ऑगस्टदरम्यान ३०४.३ मिमी पाऊस झाला असला, तरी गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत जिल्ह्यात ५०८.३ मिमी (११९.७ टक्के) पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पर्जन्यमान घसरले आहे. आता सर्व आशा सप्टेंबर महिना आणि परतीच्या पावसावर अवलंबून आहेत.