अत्याचार प्रकरणातील आरोपीस
२० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २१ : मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दीपक बालू भोसले (वय २५) यास अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. २१) २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदाळे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.
सोनपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ११ सप्टेंबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने तिचे आजोबा दूध मिळणाऱ्या घराकडे गेले. त्यावेळी त्यांना तेथे हा प्रकार निदर्शनास आला. आजोबांचा आवाज ऐकून आरोपी दीपक भोसले घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिला घेऊन सोनपेठ पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष कांबळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अजय किरकण यांनी पुढील तपास करून साक्षीपुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदाळे यांच्या न्यायालयात झाली. मुख्य सरकारी अभियोक्ता ॲड. ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडत आठ साक्षीदार तपासले. पीडितेचा जबाब, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या वस्तू तसेच पीडित मुलीचे वय यासंदर्भातील पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. हे पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले आणि २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात ॲड. ज्ञानोबा दराडे यांना ॲड. सचिन पौळ यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, महिला पोलिस हवालदार वंदना आदोडे आणि मारोती कुंडगीर यांनी काम पाहिले.
----------