सांगा, नोकर भरतीत कशी असावी पारदर्शकता?
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन, गैरप्रकार रोखण्यासाठी सूचनांची अंमलबजावणी
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील नोकर भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, निष्पक्ष आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समितीमार्फत विद्यमान परीक्षा पद्धतीचा आढावा घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांमधील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे.
अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या कार्यकक्षेनुसार प्रत्येक महसूल विभागातील संबंधित घटकांशी चर्चा करून परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्यात येणार आहेत. विद्यमान परीक्षा प्रणाली, पारदर्शकता व सुरक्षितता, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकालापर्यंतची प्रक्रिया, डिजिटल प्रणाली व बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल, सीसीटीव्ही देखरेख, प्रश्नपत्रिका गळती व पेपरफुटीला प्रतिबंध, गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना, परीक्षा केंद्रांची निवड व मूलभूत सुविधा याबाबत सूचना मागविण्यात आल्या आहेत.
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती
नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ई-मेलद्वारे आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने सादर करता येणार आहेत. हा कक्ष १८ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना सूचना, अभिप्राय
csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठविता येतील.
--
नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा ः
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी केले आहे.
-------