भरती परीक्षेवर आता ‘पारदर्शक’ नजर!
----
गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती; विद्यार्थ्यांनी सूचना द्याव्यात
----
बीड, ता. १७ : राज्यातील शासकीय भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना कायमचा पूर्णविराम देत संपूर्ण परीक्षा पद्धत अधिक सक्षम, पारदर्शक व उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या प्रक्रियेत प्रत्यक्ष परीक्षार्थी, विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग नोंदविण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व घटकांनी आपल्या सूचना, अभिप्राय व हरकती नोंदवाव्यात, असे आग्रही आवाहन छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.
भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. ही समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागात जाऊन सर्व हितधारकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे. या अनुषंगाने ही समिती येत्या २१ सप्टेंबरला सकाळी साडेदहाला छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात भेट देणार आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, अभ्यासिकाचालक व शिक्षकांना आपल्या सूचना सहज मांडता याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी सहापर्यंत खुला राहील. ज्यांना प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, ते ई-मेलद्वारेही निवेदने पाठवू शकतात, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली.
----
((कोट))
स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखून पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासेस, अभ्यासिकाचालक व लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यावहारिक सूचना व हरकती १८ सप्टेंबरपर्यंत लेखी किंवा ई-मेलद्वारे नोंदवाव्यात.
- शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड