मार्केट बझ
---------
वित्त आयोगासाठी महाराष्ट्र ग्रामीणची
अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक व्यवहारांना अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. १६ व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्यात आज ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार राज्य शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून नियुक्ती केली आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत राज्यातील २८,००० हून अधिक ग्रामपंचायती, सर्व ३४ जिल्हा परिषदा आणि ३५० हून अधिक पंचायत समित्यांना बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याप्रसंगी ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सरव्यवस्थापक दत्तात्रय कावेरी आणि बँकेचे अध्यक्ष गिरीश मोहनराव थोरात उपस्थित होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष गिरीश मोहनराव थोरात यांनी या जबाबदारीबद्दल शासनाचे आभार मानले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी हा केवळ एक व्यावसायिक करार नसून राज्याच्या ग्रामीण विकास प्रक्रियेत सक्रिय भागीदार होण्याची एक मोठी संधी आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच वित्तीय समावेशन आणि डिजिटल बँकिंगच्या प्रसारालाही मोठी मदत होणार आहे.