शुक्रवारपासून राज्यस्तरीय कला प्रदर्शन
जालना, ता. ९ : चित्रकलेच्या विविध कलाविष्कारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘मान्सून शो २०२६’ या ३३ व्या राज्यस्तरीय कला प्रदर्शनाचे शहरात आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र, अजिंठा चित्रकला महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत अंकुशराव टोपे महाविद्यालयात होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता.११) सकाळी साडेदहाला कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटर, जालना जिल्हा केंद्राचे अध्यक्ष राजेश टोपे राहणार आहेत. राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे तसेच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या राज्यस्तरीय कला प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातून १२० पेक्षा जास्त कलाकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शनासाठी नाव नोंदणी केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची संधी जालनेकरांना मिळणार आहे. कलाकारांसोबतच शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या प्रदर्शनात सहभाग नोंदवता येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून ६० पेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
कला, चित्रकला आणि सर्जनशीलतेची आवड असणाऱ्या रसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन राज्यभरातील कलाकारांच्या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रा. रावसाहेब ढवळे, प्रा. सुजाता देवरे, प्रा. रविकिरण भुतेकर, प्रा. सोलाट यांच्यासह आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.