कल्याणकारी मंडळाच्या
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
----
परभणी, ता. २९ ः जिल्हास्तरीय ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक चालकांसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र वाहतूकधारकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत प्रवासी वाहतूक चालकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रानुसार आणि आवश्यकतेनुसार मंडळामार्फत चालकांना जीवन विमा व अपंगत्व विमा, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक साह्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच कामगार कौशल्यवृद्धी योजनांचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, ६५ वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच नवीन ऑटोरिक्षा किंवा मीटर टॅक्सी खरेदी करण्यासाठी व गृहखरेदीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासह राज्यस्तरीय मंडळाने मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजनाही राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील टॅक्सी, कॅब, ॲप-आधारित ओला-उबर सेवा, पर्यटन वाहने तसेच इतर प्रवासी वाहने चालविणारे, वैध वाहनचालक अनुज्ञप्ती व बॅजधारक चालकांनी या मंडळाचे सभासदत्व स्वीकारावे व उपलब्ध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले आहे. इच्छुक चालकांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://ananddighekalyankarimandal.org) ऑनलाइन सभासद नोंदणी करता येईल. सभासद नोंदणीसाठी ५०० रुपये शुल्क, तर प्रतिवर्षी ३०० रुपये वार्षिक सभासद शुल्क भरणे आवश्यक आहे. प्रवासी वाहतूक चालकांनी वेळेत नोंदणी करून मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.