कळंब येथे महात्मा फुले साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन ;

कळंब येथे महात्मा फुले साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन ;
Published on: 
KLL26B10909 कळंब ः महात्मा फुले साहित्य संमेलनात बोलताना डॉ. प्रल्हाद लुलेकर. ‘सत्यशोधकी विचारांची अधिक गरज’ कळंब : जातीव्यवस्था, स्त्रीशिक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महात्मा फुले यांनी मांडलेले विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. दुष्काळी बालाघाट परिसरात फुले-शाहू-आंबेडकरी विचार रुजवणे, हेच संमेलनाचे खरे यश ठरेल, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय महात्मा फुले साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रा. ललिता गादगे, स्वागताध्यक्ष प्रकाश बोधले महाराज, प्रदीप ढवळ, प्रा. डॉ. राजेश गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संमेलनानिमित्त महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. संविधान, शेतकऱ्याचा असूड, तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांसह ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रामीण भागातील लेखिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रा. गादगे यांनी आयोजकांचे कौतुक केले. ........ तुळजापूर तालुक्यात ११ मतदान केंद्रे नळदुर्ग : मराठवाडा विभाग पदवीधर निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. तुळजापूर तालुक्यात ४ हजार ८०१ मतदार असून, त्यात ९७४ महिला आणि ३ हजार ८२७ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील सर्व ११ मतदान केंद्रांवर मतदानाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. तुळजापूर शहरात दोन, तसेच सावरगाव, जळकोट, नळदुर्ग, अणदूर, मंगरूळ, सलगरा (दिवटी), तामलवाडी, आरळी (बुद्रुक) आणि इटकळ येथे मतदान केंद्रे आहेत. नळदुर्ग नगरपालिका कार्यालयात मतदान केंद्र असून, शहरात १५६ महिला आणि ४७९ पुरुष असे एकूण ६३५ मतदार आहेत. नळदुर्ग ग्रामीणमध्ये चिवरी आणि होर्टी गावांचा समावेश आहे. मतदानासाठी एक क्षेत्रीय अधिकारी, पाच कर्मचारी, एक चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि दोन पोलिस कॉन्स्टेबल नियुक्त करण्यात येणार आहेत. .................... LRA26A05044 लोहारा ः सेवानिवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी यांच्या वतीने शंभर कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा खर्च टाळून किराणा किटचे वाटप लोहारा : वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत फणेपूर येथील सेवानिवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी यांनी आपल्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त गावातील १०० गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांना त्यांनी मदतीचा हात दिला. जेवळी येथील गुरुसिद्धेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती गुरू गंगाधर महास्वामी आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम झाला. यावेळी पोलिस पाटील राजकुमार माळी, माजी सरपंच नारायण निंगशेट्टी, उपसरपंच दत्तात्रय काळे, शाखा अभियंता किरण भोजने, माजी सैनिक बालाजी भोजने, माजी सरपंच मुक्ताबाई भोजने, सहायक अभियंता सोनाली राऊत भोजने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ............... तीर्थ खुर्दमध्ये दोन घरांत चोरी तुळजापूर : तालुक्यातील तीर्थ खुर्द येथे रविवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करीत चोरी केली. एका घरातून सहा हजार रुपये रोख रक्कम, तर दुसऱ्या घरातून साड्या व इतर वस्तू चोरीला गेल्या. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी अरुण भुसणे यांच्या घराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करून सहा हजार रुपये चोरले. तसेच गिरजाबाई भोसले या वृद्ध महिला मुलीकडे होर्टी येथे गेल्या असताना त्यांच्या घरातही चोरी झाली. चोरट्यांनी घरातील काही साड्या व वस्तू लंपास केल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गावचे पोलिस पाटील अक्षय पवार यांनी ही माहिती दिली. ................... TTR26A01405 तुरोरी ः जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत जिल्हा परिषद हंद्राळच्या शाळेतील स्नेहल बिराजदार हिने प्रथम क्रमांक पटकावला. स्नेहल बिराजदारचे स्पेलिंग बी स्पर्धेत यश तुरोरी : हंद्राळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्नेहल गजानन बिराजदार हिने स्पेलिंग बी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल शाळेच्या वतीने सोमवारी (ता.१९) सत्कार करण्यात आला. शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कुंभार आणि पोलिस पाटील बालाजी मुचळंबे यांच्या उपस्थितीत स्नेहलचा गौरव करण्यात आला. तिचे वडील गजानन बिराजदार यांचे प्रोत्साहन, तसेच मुख्याध्यापक बालाजी बडूरे आणि शिक्षक राहुल सूर्यवंशी, ज्ञानदेव ममाळे व बसवराज सूनगार यांचे मार्गदर्शन तिच्या यशासाठी मोलाचे ठरले. स्नेहलच्या यशामुळे शाळा, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उपस्थितांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ............ तुळजापूरच्या पाइपलाइनमधून पाणी चोरी नळदुर्ग : बोरी धरणातून तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या व्हॉल्व्हमध्ये छेडछाड करून शेतीसाठी पाणी वापरल्याप्रकरणी अणदूर येथील तयव्वा सुभाष गोवे यांच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १६ ऑक्टोबरला पाइपलाइनची पाहणी करताना मानेवाडी शिवारातील गट क्रमांक ९४/२ मध्ये व्हॉल्व्हमध्ये छेडछाड झाल्याचे आढळले. व्हॉल्व्हच्या चेंबरवर सहा फूट उंच सिमेंट-काँक्रीटचा हौद बांधून त्यात पाणी साठवले जात होते. तेथून आठ इंची पाइपद्वारे सुमारे एक हजार फूट अंतरावरील शेतातील विहिरीत पाणी नेऊन शेतीसाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले. तुळजापूर नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता कमलेश रंगारी यांच्या तक्रारीवरून सोमवारी (ता. १९) संबंधित महिलेविरुद्ध महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com