दोन महिन्यांत तडजोडीतून तेरा प्रकरणे निकाली
----
महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान
-----
हिंगोली, ता. १५ : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि हक्क पोचविणे हे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने आणि तडजोडीने निपटारा करण्यासाठी जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दोन महिन्यांत १३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
हे अभियान एक सप्टेंबरपासून सुरू झाले असून, मार्च २०२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांत प्रलंबित महसुली दाव्यांचा अभियानात समावेश आहे. तडजोडीने आतापर्यंत १३ प्रकरणे निकाली निघाली. त्यात अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयातील चार, हिंगोली तहसीलमधील पाच आणि कळमनुरीतील चार प्रकरणांचा समावेश आहे. अर्धन्यायिक न्यायालयात प्रलंबित महसुली दाव्यातील दोन्ही पक्षकारांनी किंवा त्यांच्या वकिलांनी विहित नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज करावा. अर्जाची छाननी करून दोन्ही पक्षांची संमती निश्चित केली जाते. त्यानंतर कायदेशीर तडजोडनामा घेऊन लोकअदालतीच्या दिवशी अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढले जाते.
---------
((कोट))
महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान एक सप्टेंबरपासून राबविण्यात येत असून, आपापसातील तडजोडीने, सहमतीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. प्रलंबित सर्व महसुली दाव्यांचा अभियानात समावेश असून, या अभियानात नागरिकांनी सहभागी होऊन आपले काही वादाची प्रकरणे असतील तर ती मिटवून घ्यावीत.
- राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी