महावितरणचा हेल्पलाईन नंबर की शो-पीस ?; नागरीक हैराण

महावितरणचा हेल्पलाईन नंबर की शो-पीस ?; नागरीक हैराण
Published on: 
पान ३ लीड ----- ABD26J80939 बिल थकलं तर लाइन कापायला येता, मग तक्रारीला फोन का उचलत नाही? महावितरणचा कारभार चव्हाट्यावर; हेल्पलाइन नंबर की शो-पीस? फोन उचलला तरी मौन ----- नितीन चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ८ ः गेल्या आठवड्यात आमच्या गल्लीतल्या डीपीत भयंकर स्पार्क झाला. आगीच्या ठिणग्या उडत होत्या. मोठा अनर्थ घडू नये म्हणून मी घाबरून स्वतः महावितरणच्या हेल्पलाइनला फोन लावला. तीन-चार वेळा प्रयत्न केल्यावर साहेबांनी फोन उचलला, पण अडचण ऐकून घेण्याऐवजी पलीकडून अत्यंत अर्वाच्च आणि उद्धट भाषेत मलाच सुनावले आणि फोन कट केला! बीडच्या महावितरण अधिकाऱ्यांची ग्राहकांशी बोलण्याची हीच पद्धत आहे का? बीडमधील सचिन काळे यांचा हा संतप्त सवाल केवळ एका व्यक्तीचा नाही, तर महावितरणच्या ढिसाळ कारभाराने होरपळणाऱ्या संपूर्ण बीडकरांच्या भावनांना वाट करून देणारा आहे. रात्री-अपरात्री अचानक वीज जाते, सर्वसामान्यांची घरे अंधारात बुडतात, पण त्यांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी बीड महावितरणचे अधिकारी मात्र स्वतःच्या मर्जीतील गुत्तेदारांवर शासकीय निधीची उधळण करण्यात मग्न आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा देण्याची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी असलेल्या महावितरण कंपनीचा कारभार सध्या कमालीचा खालावला आहे. वीजपुरवठा खंडित होणे, रोहित्रे (डीपी) जळणे किंवा व्होल्टेजच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरणने ७८७५१७६४६४ हा विशेष मोबाइल क्रमांक तक्रार निवारणासाठी जाहीर केला आहे. मात्र, हा हेल्पलाईन क्रमांक केवळ कागदी घोडे नाचवणारा शो-पीस ठरला आहे. यावर फोन केल्यास एकतर तो उचललाच जात नाही, उचलला तर पलीकडून कुणी बोलत नाही, आणि बोललेच तर अरेरावीची भाषा वापरली जाते, असा भयंकर अनुभव नागरिक रोज घेत आहेत. थकबाकीच्या नावाखाली सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन कापण्यासाठी हेच कर्मचारी तत्परतेने धावून येतात, पण सेवेची वेळ आल्यावर मात्र ते गायब असतात. ------ गुत्तेदारांवर निधीची खैरात अन् टक्केवारीचा खेळ एकीकडे सर्वसामान्य जनता विजेशिवाय अंधारात आणि विविध समस्यांच्या गर्तेत खितपत पडलेली असताना, दुसरीकडे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी मात्र स्वतःच्या मर्जीतल्या गुत्तेदारांवर (कंत्राटदार) निधी वाटपाचा ‘डोंगर’ फुलवू लागले आहेत. ग्राहकांच्या अत्यंत महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. केवळ मर्जीतील ठेकेदारांची बिले काढण्यात आणि आपली टक्केवारी सेट करण्यात अधिकारी व्यस्त असल्याचा उघड आणि गंभीर आरोप नागरिक करत आहेत. कामाचा दर्जा खालावलेला असतानाही कागदावर सर्वकाही आलबेल दाखवून शासकीय निधीची उघड लूट सुरू आहे. ------ तक्रार निवारण यंत्रणेचा उडाला बोजवारा रात्रीच्या वेळी अचानक वीज गायब झाल्यावर फोन केला की तास न् तास हा हेल्पलाईन नंबर व्यस्त असतो किंवा त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही. महावितरणने हा क्रमांक फक्त नावापुरता जाहीर केला आहे का? अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी संतप्त मागणी स्थानिक नागरिक अर्जुन राख यांनी केली आहे. सामान्य ग्राहकाने वीज बिल भरण्यास थोडे जरी दिवस उशीर केला की लगेच कनेक्शन कापायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या त्रासाचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही, अशी खंत दिनेश भोसले यांनी व्यक्त केली. ----- वरिष्ठांचे नियंत्रण शून्य; उच्चस्तरीय चौकशीची मागणी महावितरणची संपूर्ण तक्रार निवारण यंत्रणाच मुळापासून कोलमडली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या कामचुकार आणि उद्धट कर्मचाऱ्यांवर अजिबात नियंत्रण उरलेले नाही. फोन उचलून गप्प बसणे किंवा ग्राहकांनाच अपमानित करणे, हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. या अत्यंत निष्काळजी आणि मनमानी कारभाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका सामाजिक कार्यकर्ते ॲड. राजेश शिंदे यांनी मांडली आहे. बीड महावितरणच्या या भोंगळ कारभाराला आता कोणी वाली उरला आहे की नाही, असा उद्विग्न सवाल जनता विचारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com