पान ४ अँकर

पान ४ अँकर
Published on: 
----- महावितरणचा कर्मचाऱ्यांना दणका; दुरुस्तीच्या कामांत खासगी व्यक्तींना ‘नो एंट्री’ ट्रान्सफॉर्मर, फ्यूज दुरुस्तीसाठी खासगी व्यक्ती नेमल्यास थेट बडतर्फी; कडक इशारा सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १२ (बातमीदार): महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, उच्चदाब वाहिनीतील बिघाड दूर करणे, डीओ फ्यूज टाकणे यांसारखी अत्यंत जोखमीची व तांत्रिक कामे सर्रासपणे अनधिकृत आणि खासगी व्यक्तींकडून करून घेतली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या बेकायदेशीर आणि जीवघेण्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे तांत्रिक आणि धोक्याची कामे कोणत्याही खासगी किंवा अनधिकृत व्यक्तीकडून करून घेण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, असे प्रकार आढळल्यास आणि त्यातून अपघात घडल्यास संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर थेट बडतर्फीची (नोकरीवरून काढण्याची) कारवाई केली जाईल, असा सज्जड दम महावितरण मुख्यालयाने दिला आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि ग्रामीण भागातील शेतीपंपांची मोठी संख्या पाहता, वीजपुरवठ्याच्या तक्रारी नेहमीच येत असतात. वीज यंत्रणेची सुरक्षितता, देखभाल आणि दुरुस्ती करण्याची प्राथमिक जबाबदारी ही महावितरणच्या संबंधित अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची असते. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, तसेच तांत्रिक बिघाड तातडीने दूर व्हावेत, यासाठी महावितरणने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तारमार्ग संवर्गातील प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. वितरण यंत्रणेतील सर्व प्रकारची तांत्रिक कामे पार पाडण्याची जबाबदारी याच कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. नादुरुस्त वितरण रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बदलणे, डीओ फ्यूज जोडणे, तुटलेल्या तारा पूर्ववत करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि थकबाकीदारांचे मीटर काढणे या कामांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. मात्र, अनेक गावांमध्ये काही अधिकृत कर्मचारी ही कामे स्वतः करण्याऐवजी, गावांमधीलच काही तरुणांना हाताशी धरून किंवा खासगी व्यक्तींच्या माध्यमातून करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतच्या तक्रारी मुख्यालयापर्यंत पोहोचल्या होत्या. ------ प्रशिक्षणाचा अभाव ठरू शकतो जीवघेणा वीज यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी खासगी व्यक्तींची मदत घेणे ही अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर बाब असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीज खांबावर चढून काम करण्यासाठी विशिष्ट कौशल्ये आणि सुरक्षिततेच्या उपकरणांची आवश्यकता असते. या अनधिकृत व्यक्तींकडे आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि विद्युत सुरक्षेचे कोणतेही प्रशिक्षण नसते. त्यामुळे काम करताना विजेचा जोरदार धक्का बसणे, खांबावरून पडून यांत्रिक अपघात होणे आणि त्यातून थेट जीवितहानी होण्याचा मोठा धोका असतो. दुर्दैवाने अशा अपघातात एखाद्या खासगी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळते आणि महावितरणकडून अधिकृत नुकसानभरपाई मिळण्यातही तांत्रिक अडचणी येतात. ------ दोषी कर्मचाऱ्यांवर थेट कारवाईची कुऱ्हाड या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून खासगी व्यक्तींकडून कामे करून घेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने स्वतःच्या जबाबदारीवरील काम परस्पर दुसऱ्या अनधिकृत व्यक्तीला दिले आणि त्यातून काही अपघात घडला, तर त्याला सर्वस्वी तोच कर्मचारी जबाबदार राहील. अशा कर्मचाऱ्यावर कोणतीही दया न दाखवता थेट सेवेतून बडतर्फ करण्याची कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ------ या कामांसाठी खासगी व्यक्तींना सक्त मनाई: - नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) बदलणे किंवा दुरुस्त करणे. - खांबावरील डीओ फ्यूज बदलणे किंवा टाकणे. - उच्च व लघुदाब विद्युत वाहिनीतील बिघाड शोधून दुरुस्त करणे. - वीज ग्राहकांचे मीटर काढणे अथवा नवीन मीटर बसवणे. - थकबाकी वसुलीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com