‘राज्याच्या विकासात महावितरण
अभियंत्यांचे मोलाचे योगदान’
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १६ ः देशाच्या विकासात अभियांत्रिकी क्षेत्राचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासात महावितरणमधील अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गजेंद्र बावणे यांनी काढले.
महावितरणच्या शहर व ग्रामीण मंडलातर्फे मंगळवारी (ता. १५) भानुदास चव्हाण सभागृहात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आला. बावणे म्हणाले, ‘‘महावितरणचे अभियंते ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याचे जिकिरीचे, महत्त्वाचे काम करतात. मात्र त्यांची मेहनत ग्राहकांपर्यंत पोचत नाही. त्यासाठी महावितरण व ग्राहकांमधील दरी अभियंत्यांनी दूर करावी. ग्राहकांना आपुलकी वाटेल असे काम करावे. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल. ग्राहकांना दर्जेदार सेवा देऊन महावितरणचा नावलौकिक वाढवण्यासाठी काम करा’’. प्रमुख अतिथी उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी महावितरण अभियंत्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना सर्वांना विद्युत सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले. लाईफ कोच मिताली लाठी यांनी तणाव व्यवस्थापनावर मागर्दर्शन केले. छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, महावितरण अभियंत्यांनी व्यक्त व्हायला हवे. आपले काम जनतेपर्यंत पोचवले पाहिजे. नवनवीन कौशल्ये आत्मसात करून बदलाला सामोरे जायला हवे. अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, गोरक्षनाथ सपकाळे, बीना सावंत यांची उपस्थिती होती. उपकार्यकारी अभियंता स्मिता वाघमारे, सहायक अभियंता अविनाश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. अश्विनी पोतलवाड यांनी परिचय करून दिला. उपव्यवस्थापक पांडुरंग पठाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्राजक्ता पगारे यांनी आभार मानले.