पान ३ लीड
-----
गुत्तेदारांना नोटीस; मग ३८ लाखांची बिले मंजूर करण्याचा घाट कसा?
महावितरणमध्ये अंधेरनगरी; कारवाईचा केवळ दिखावा, संशयित बिलांमधून शासकीय निधीची उघड लूट
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ११ ः शहरात वारंवार बत्ती गुल होत असल्याने नागरिक आधीच त्रस्त असताना, महावितरणच्या अधिकाऱ्यांचा एक भयंकर आणि दुटप्पी कारभार चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे कामात कुचराई करणाऱ्या गुत्तेदारांना कारवाईची नोटीस बजावून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करायची आणि दुसरीकडे त्याच गुत्तेदारांची तब्बल ३८ लाख रुपयांची संशयास्पद बिले मंजूर करण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली करायच्या, असा धक्कादायक प्रकार बीड अर्बन उपविभागात उघडकीस आला आहे. एकाच डीपीवर वारंवार बिघाड दाखवून लाखो रुपये लाटण्याच्या या सावळ्या गोंधळामुळे महावितरणचा भ्रष्ट चेहरा उघडा पडला असून, या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
शहर उपविभाग क्रमांक २ व ३ च्या कार्यक्षेत्रात वीज वाहिनीची देखभाल-दुरुस्ती (लाईन मेंटेनन्स), ब्रेकडाऊन आणि दैनंदिन कामांत कंत्राटदारांकडून सातत्याने निष्काळजीपणा होत असल्याचा अहवाल सहायक अभियंत्यांनी २६ जून २०२६ रोजी दिला होता. या अहवालाची दखल घेत, कार्यकारी अभियंत्यांनी १० जुलै २०२६ रोजी अभिनव इलेक्ट्रिकल्स ॲण्ड सप्लायर्स, पावर इंजिनिअरिंग, साई इलेक्ट्रिकल्स ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, पियुष इलेक्ट्रिकल (नगर रोड) आणि जय हिंद इलेक्ट्रिकल्स या पाच प्रमुख एजन्सींना कारण दाखवा नोटीस बजावली होती. विजेचा बिघाड तातडीने न सोडवणे, रोहित्र (डीपी) व ब्रेकर दुरुस्ती वेळेत न करणे आणि वारंवार सूचना देऊनही कामाच्या ठिकाणी पुरेसे कामगार व साहित्य उपलब्ध न ठेवणे, असे गंभीर ठपके या गुत्तेदारांवर ठेवण्यात आले होते. तीन ते सात दिवसांत खुलासा न केल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, ही नोटीस म्हणजे केवळ कारवाईचे नाटक असल्याचे आता समोर आले आहे.
------
एकतर्फा नोटीस बजावून दंडात्मक कारवाईचा दिखावा सुरू असतानाच, दुसरीकडे याच नोटिसीतील जय हिंद इलेक्ट्रिकल्स या एजन्सीची तब्बल ३८ लाख ७७ हजार ५ रुपयांची तीनपेक्षा जास्त बिले पास करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून संशयास्पद धडपड सुरू आहे. ज्या गुत्तेदाराच्या कामावर स्वतः महावितरणने गंभीर ताशेरे ओढले आहेत, त्याचीच लाखो रुपयांची बिले विनासायास कशी काढली जात आहेत? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
------
ब्रेकडाउनच्या नावाखाली बिलांचा काळा बाजार
या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे तपासली असता, बीड अर्बन उपविभागात एलटी/एचटी लाईन आणि डीटीसी ब्रेकडाउन मेंटेनन्सच्या नावाखाली कागदोपत्री प्रचंड मोठा फुगवटा तयार केल्याचे उघडकीस आले आहे. जय हिंद इलेक्ट्रिकल्सने थकीत रकमेसाठी सादर केलेल्या बिलांची यादी चक्रावून टाकणारी आहे. मजहर डीपी (क्र. ४४१२२३२) या एकाच डीपीवर अनुक्रमे २१,६४४, ११,५०९, ७८,४४४ आणि ३९,२४७ अशा तब्बल चार नोंदी करून दीड लाखांहून अधिक रुपयांची उधळण दाखवण्यात आली आहे. इंडस टॉवर भक्ती कन्स्ट्रक्शन डीपी (क्र. ४४१२९१५) यावर दोन वेगवेगळ्या नोंदींद्वारे १ लाख ४३ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च दाखवला आहे. तसेच, गांधी नगर डीपी (क्र. ४४१२०६५) आणि खसबाग देवी डीपी (क्र. ४४१२०२५) या दोन्ही डीपींवर अल्पावधीत वारंवार कामे दाखवून प्रत्येकी ७५ हजार ते १ लाखांपर्यंतचा संशयास्पद खर्च लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. याशिवाय पोस्ट ऑफिस बशीरगंज, एन. के. कॉलनी आणि वाहेद नगर डीपीवरही अशाच प्रकारे कागदोपत्री बिघाड दाखवून शासकीय निधीची राजरोसपणे लूट सुरू आहे.
-------
दक्षता पथकामार्फत चौकशीची मागणी
एकाच ट्रान्सफॉर्मरवर इतक्या कमी कालावधीत वारंवार एवढा मोठा बिघाड कसा होतो? आणि ही कामे प्रत्यक्षात जागेवर झाली आहेत की केवळ कागदावरच बिलांची लूट झाली आहे? याचे उत्तर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावेच लागेल. या उघड भ्रष्टाचाराची महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरून व दक्षता पथकाने तातडीने सखोल चौकशी करावी, बिलांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन भौतिक पडताळणी करावी आणि यात दोषी आढळणारे अधिकारी व कंत्राटदारांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक मागणी बीडमधील त्रस्त वीज ग्राहकांनी केली आहे.