(अँकर) ABD26J83205 खोराड सावंगी ः टोकवाडीत मका बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
......
जनावरांच्या चाऱ्यासाठी मका बियाण्यांचा आधार
टोकवाडीत २० ते २५ पशुपालकांना मोफत बियाण्यांचे वाटप; हिरव्या चारा निर्मितीसाठी प्रोत्साहन
खोराड सावंगी, ता. १५ : पशुपालकांना जनावरांसाठी वर्षभर पुरेशा प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध व्हावा, तसेच चारा टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने डॉ. शशिकांत शिंदे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जी.डी. कटके पशुवैद्यकीय चिकित्सालय, हेलस यांच्या वतीने टोकवाडी (ता. मंठा) येथे २० ते २५ पशुपालकांना मोफत मका चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दुग्धोत्पादन वाढीसाठी हिरव्या चाऱ्याला विशेष महत्त्व आहे. मात्र, अनेकदा पावसाचे अनियमित प्रमाण, पाण्याची कमतरता आणि चारा पिकांच्या लागवडीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मका चारा पिकाची लागवड केल्यास पशुपालकांना जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. याच उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मका चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. टोकवाडी येथील ज्या शेतकरी व पशुपालकांकडे पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध आहे आणि चारा पिकाची लागवड करून त्याला आवश्यक पाणी देणे शक्य आहे, अशांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या वतीने करण्यात आले आहे. पशुपालन हा ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. जनावरांना नियमित आणि सकस हिरवा चारा मिळाल्यास पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम होण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बियाणे वाटपाच्या वेळी टोकवाडी येथील शेतकरी व पशुपालक उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमामुळे परिसरातील पशुपालकांना चारा निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
................
कोट
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांनी जनावरांच्या चारा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जनावरांना केवळ चारा उपलब्ध करून देण्यापेक्षा सकस व पौष्टिक चारा देणे महत्त्वाचे आहे. यासाठी मका चारा बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. तसेच हायड्रोपोनिक चारा निर्मिती, अझोला उत्पादन, मुरघास तयार करणे आणि निकृष्ट चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
-डॉ. जी.डी. कटके, पशुधन, पर्यवेक्षक