ध्वनिफीत प्रकरणाच्या
मुळाशी न गेल्यास संशय
---
मनोज जरांगे यांचा पुनरुच्चार
--
अंकुशनगर (जि. जालना), ता. २६ (बातमीदार) ः ‘‘पाचशे कोटींसंदर्भात यापूर्वी जाहीर केलेल्या ध्वनिफीतीच्या मुळाशी जाऊन निःपक्ष चौकशी करावी, यात कोणाचे आवाज आहेत, त्यांच्यामागे कोण आहे, त्यांना कोणाचा पाठिंबा आहे, याचा शोध घेतला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास वस्तुस्थिती समजेल’’, असा पुनरुच्चार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सोमवारी (ता. २६) येथे केला.
कथित ध्वनिफीतीमध्ये भाजपमधील काही लोक असल्याचा दावा जरांगे यांनी केला. मात्र, या घडामोडींची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना होती का, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचा तपास झाला नाही, तर फडणवीस यांच्याबाबतही लोकांच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून ही ध्वनिफीत तयार केल्याचे सांगून विषय संपवता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक लक्ष्य करून त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा डाव होता का, याचाही तपास झाला पाहिजे. शिंदे यांनीही या प्रकरणात सत्य बाहेर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. या प्रकरणात त्यांच्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली, तरी आम्ही तयार आहोत; मात्र हा विषय आरक्षणाच्या लढ्यापासून वेगळा आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले...
--
- शिवसेना नेते रामदास कदम यांनी घेतलेल्या भूमिकेला आपण प्रखर भूमिका मानत नाही.
- या प्रकरणात बोलणाऱ्या व्यक्तींच्या मागे देशातील एखादा मोठा नेता असण्याची शक्यता.
- सत्य बाहेर येईपर्यंत गप्प बसणार नाही, पाठपुरावा करणार, आपणही पुरावे शोधणार.